विजेवरील वाहनधारकांच्या खिशाला चाट!
महावितरणच्या वीजदरात वाढ; इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी विजेवरील वाहनांच्या (इलेक्ट्रिक) वापराला सुरुवात केली. परंतु आता त्यांच्याही खिशाला चांगलीच चाट लागणार आहे. १ जुलैपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रतियुनिटमागे ५० पैशांहून अधिकची वाढ होणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महावितरणने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नुकतेच वीजदर निश्चितीचे आदेश जारी केले. त्यानुसार कमी वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिलासा तर विजेवरील वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात पुढील पाच वर्षे वाढ होत राहणार असल्याचे दिसत आहे. सध्या महावितरणकडून पुवरल्या जाणाऱ्या प्रतियुनिटचा दर ८.४७ रुपये असून, तो १ जुलैपासून ९.०१ रुपये एवढा होणार आहे. मुंबईत वीज वितरण करणाऱ्या टाटा पाॅवर, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टच्या तुलनेत महावितरणचे वीजदर जास्त असणार आहेत.
---------
दरवाढीचा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर परिणाम
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे इंधन आयात करावे लागत असल्याने त्यावरही परकीय चलन खर्च होते. त्याची दखल घेत वीज आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीजदर निश्चित करताना इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर सहा रुपये एवढा निश्चित केला होता. मात्र यंदाची दरवाढ पाहता आयोगाने प्रोत्साहन मोहीम गुंडाळल्याचे दिसत आहे.
-------------
पुरवल्या जाणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर (रुपयांमध्ये)
२०२५-२६ - २०२६-२७ - २०२७-२८ - २०२८-२९ - २०२९-३०
महावितरण - ९.०१ - ९.२६ - ९.२५ - ९.२५ - ९.६६
टाटा पाॅवर - ८.०७ - ७.४२ - ७.४९ - ७.७० - ७.५४
अदाणी इले. - ८.०७ - ७.४३ - ७.५० - ७.७२ - ७.५६
बेस्ट - ८.४१ - ७.४३ - ७.५० - ७.७२ - ७.५६
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.