गणेशोत्सवाला राजकारणापासून दूर ठेवा
समितीने मंडळांना बजावले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २६ : महापालिका निवडणुका अगदी उंबरठ्यावर आल्या असल्या तरी गणेशोत्सव हा मतांचा खेळ नव्हे, तर भक्तीचा उत्सव आहे, असा ठाम इशारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिला आहे. राजकारण्यांनी मंडळांच्या मंचावरून मतांची भाषा बोलण्याचा मोह टाळा. हा उत्सव हा केवळ भक्ती, सामाजिक ऐक्य आणि मराठी संस्कृतीचा उत्सव आहे, असे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी स्पष्ट केले.
समितीने मंडळांना बजावले की, गणेशोत्सवाच्या नावाखाली राजकीय मिरवणुका, भाषणे किंवा प्रचार केल्यास उत्सवाच्या पवित्रतेला धक्का बसेल. गणेशोत्सवाला गालबोट लागू देणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक मंडळाची आहे, असे समितीने ठणकावून सांगितले.
गणेशोत्सवाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावरही लक्ष द्या. पावसामुळे मंडप परिसरात डासांची पैदास होऊ नये म्हणून धूरफवारणी करावी, विजेच्या रोषणाईची काळजी घ्यावी, अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मूर्ती सुरक्षित ठेवाव्यात. सीसीटीव्ही, मदत कक्ष, हरवले-सापडले कक्ष, पिण्याचे पाणी व बसण्याची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावी. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शनमार्गिका ठेवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
मराठी संस्कृतीचे प्रदर्शन
यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होत असल्याने मंडळांनी मराठी भाषा, परंपरा आणि संस्कृतीचा इतिहास सामाजिक देखाव्यातून प्रकट करावा, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली. हा लोकोत्सव आहे, राजकीय वादाचा मंच नाही. निवडणुकीचे राजकारण वेगळे आहे, पण गणपती बाप्पाच्या आराधनेतून समाजाला एकत्र आणणे हेच आमचे ध्येय आहे, असे दहिबावकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.