दर चौथा कर्मचारी पूर्व मधुमेह बाधित
सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : व्यावसायिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेह आणि पूर्व मधुमेहाच्या रुग्णसंख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. ‘कॉर्पोरेट इंडिया हेल्थ स्क्रिनिंग’च्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात व्यावसायिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पूर्व मधुमेहाचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले असून, दर चौथा कर्मचारी पूर्व मधुमेह बाधित म्हणजेच मधुमेहाच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईसह देशभरातील ३१ ते ५० वर्षे वयोगटातील व्यावसायिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे खासगी ‘डिजिटल हेल्थकेअर कंपनी’ सर्वेक्षण करण्यात येते. गेल्या वर्षीच्या तपासणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान तपासलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ७.८९ टक्के कर्मचारी मधुमेहग्रस्त आढळले, तर १९.३८ टक्के कर्मचारी पूर्व मधुमेहग्रस्त होते. मात्र ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षीच्या तपासणीत ८.८५ टक्के कर्मचारी मधुमेहग्रस्त आणि तब्बल २४.४० टक्के कर्मचारी पूर्व मधुमेहग्रस्त आढळले. खासगी हेल्थकेअर कंपनीच्या वैद्यकीय संचालन प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सांगितले, की व्यावसायिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये वाढणारा मधुमेह आणि पूर्व मधुमेह हा धोकादायक आहे.
पुरुष अधिक प्रभावित
गेल्या दोन वर्षांत महिलांच्या तुलनेत पुरुष कर्मचारी अधिक प्रभावित झाले आहेत. मधुमेहग्रस्त पुरुष कर्मचाऱ्यांचे प्रमाण एका वर्षात ६.७६ टक्क्यांवरून ७.४३ टक्क्यांपर्यंत पोहोचले, तर पूर्व मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण १४.६४ टक्क्यांवरून १८.११ टक्क्यांपर्यंत वाढले. महिलांच्या बाबतीत मधुमेहाचे प्रमाण १.१३ टक्क्यांवरून १.४२ टक्क्यांपर्यंत वाढले असून, पूर्व मधुमेहाचे प्रमाण ४.७४ टक्क्यांवरून ६.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.