कुर्ला-विद्याविहारदरम्यान वेगमर्यादा
लोकल वेळापत्रक कोलमडले
मुंबई, ता. ९ : मध्य रेल्वेने कुर्ला ते विद्याविहारदरम्यान सुरू असलेल्या सिग्नल यंत्रणेच्या कामामुळे मंगळवारी सकाळी अचानक वेगमर्यादा लागू केली. त्यामुळे मोटरमनला लोकल गाड्यांचा वेग कमी करावा लागला. ही मर्यादा सकाळी ८.३० च्या सुमारास घालण्यात आल्याने गाड्यांची गती फक्त ३० किलोमीटर प्रतितास राहिली. परिणामी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
सकाळच्या गर्दीच्या तासांत अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. अनेकांना कार्यालयात ‘लेटमार्क’ बसल्याने नाराजी व्यक्त केली. सकाळच्या वेळी अचानक वेगमर्यादा लावली जाणे म्हणजे प्रवाशांच्या हालअपेष्टा वाढवणे, अशी टीका प्रवाशांनी केली. मध्य रेल्वे प्रशासनाकडून मात्र या कामाबाबत कोणतेही आगाऊ नियोजन किंवा पर्याय प्रवाशांना कळविण्यात आला नाही.