खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस
१११ ठिकाणी भरलेले खड्डे उखडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ९ : पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईकरांची खड्ड्यांच्या तक्रारी मात्र वाढतच आहेत. फक्त एका दिवसात तब्बल ८५ नवीन तक्रारी पालिकेकडे नोंदल्या गेल्या. धक्कादायक बाब म्हणजे यातील १११ खड्डे हे पूर्वी भरून काढलेले असून, पुन्हा उखडले आहेत. सध्या पालिकेच्या ‘पोर्टहोल्स ॲप’वर एकूण १३,९७७ तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यापैकी चालू महिन्यातच तब्बल ९४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रशासनाचा दावा आहे की १३,३२० तक्रारी निकाली काढल्या आहेत; मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की, दुरुस्ती कामे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी आहे.
भरलेले खड्डे पुन्हा उखडल्याने रस्त्यावर रेती-खडी पसरली आहे; परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वार व पादचारी रोजचा प्रवास जीव मुठीत धरून करत असल्याची तक्रार आहे. एका नागरिकाने संताप व्यक्त करताना म्हटले, रस्ते दुरुस्तीची कामे नेहमीच मोठ्या गाजावाजाने सुरू होतात, पण प्रत्यक्षात ती टिकत नाहीत. थोडासा पाऊस झाला तरी खड्डे पडतात. सध्या ६५७ तक्रारींवर कारवाई प्रलंबित असून हजाराहून अधिक ठिकाणी खड्डे कायम आहेत. त्याशिवाय १,०५५ तक्रारी इतर विभागांशी संबंधित असल्याने वर्गीकृत केल्या आहेत, तर ३,८०८ तक्रारी खड्ड्यांशी संबंधित नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
.....