मालेगाव खटल्यांतील आरोपींच्या सुटकेला आव्हान
विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीडितांचे अपील
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींच्या निर्दोष सुटकेला पीडितांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मृतांच्या कुटुंबीयातील सहा सदस्यांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने ३१ जुलै रोजी साध्वी प्रज्ञासिंह, प्रसाद पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी अशा सात आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती. विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय चुकीचा आणि कायद्याला धरून नव्हता. म्हणून तो रद्द करावा, अशी मागणी निसार अहमद सय्यद बिलाल यांच्यासह अन्य पाच जणांनी वकील मतीन शेख यांच्यामार्फत दाखल अपिलातून केली आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी न्या. अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
---
एनआयएकडून दबाव!
दोषपूर्ण तपास किंवा तपासातील काही त्रुटी आरोपींना निर्दोष सोडण्याचे कारण असू शकत नाही. हा कट गुप्ततेत रचलेला असल्याने, त्याचे थेट पुरावे असू शकत नाहीत, असा दावा पीडितांनी अपिलामध्ये केला आहे. याप्रकरणी आरोपींना फायदा होण्याच्या दृष्टीने तपास दोषपूर्ण असल्याचे नमूद करून त्याला मान्यताही दिली. एनआयएने आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप खटल्यात विशेष सरकारी वकिलांनी केला होता. त्यानंतर त्यांची खटल्यातून हकालपट्टी करून नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती केल्याचेही अपिलात नमूद केले आहे.