गिर्यारोहणातून संविधानाचा जागर
सीमा माने यांचा अनोखा पर्वत प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महापालिकेच्या उद्यान विभागातील हॉर्टिकल्चर असिस्टंट आणि गिर्यारोहक सीमा माने यांनी जगभरातील उंचच उंच शिखर पादाक्रांत करण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. माझे संविधान, माझा अभिमान या मोहिमेतून जनजागृतीचा हा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीमा माने यांनी नुकताच ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत सर करून तिरंगा फडकावला; मात्र त्यांची यंदाची युरोप मोहीम थोडक्यात अपूर्ण राहिली असली तरी त्यांच्या धैर्याने आणि निर्धाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तब्येतीच्या कारणास्तव अवघ्या ९४ मीटर अंतरावर असताना त्यांनी माउंट एल्ब्रुस (५६४२ मीटर) हे युरोपातील सर्वोच्च शिखर सर करण्यापासून माघार घेतली.
५ सप्टेंबरला मध्यरात्री २ वाजता गाराबाशी (३८०० मीटर) येथून त्यांनी चढाईला सुरुवात केली. तब्बल नऊ तासांच्या कठीण प्रवासानंतर त्या ५,५४८ मीटर उंचीवर पोहोचल्या; मात्र प्रकृती खालावल्याने परतीचा निर्णय घ्यावा लागला. ‘‘शिखर गाठण्यापेक्षा सुरक्षित परतणे महत्त्वाचे,’’ असे सीमा माने म्हणाल्या. उतरताना रशियन गिर्यारोहक अँटन आणि मरीना यांनी त्यांना मदत केली.
सीमा माने यांना गिर्यारोहणाची ओढ ‘सात शिखर मोहिमे’च्या स्वप्नाकडे घेऊन गेली आहे. त्याअंतर्गत त्यांनी नुकतेच १९ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत माउंट कोझियुस्को (२२२८ मीटर) सर करून तिरंगा फडकावला. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या संदेशाचा प्रसार केला. याआधी त्यांनी आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो (२०२४) सर केला आहे. तसेच हिमाचलमधील फ्रेंडशिप पीक, उत्तराखंडातील भागीरथी-२ आणि सह्याद्रीतील अनेक किल्ले व शिखरे त्यांनी पादाक्रांत केली आहेत.
‘‘शारीरिक तयारीसोबत मानसिक ताकदही तितकीच महत्त्वाची असते. एल्ब्रुसवर या वेळी मी शिखर गाठले नाही, पण पर्वताने नम्रता आणि संयम शिकवला. पुढील वर्षी अधिक तयारी आणि योग्य मार्गदर्शकासह मी नक्की परत येईन,’’ असे सीमा माने आत्मविश्वासाने सांगतात. सीमा माने या भटवाडी, घाटकोपर (पश्चिम) येथे पती मिथुन सर्वगोड यांच्यासोबत राहतात. त्यांचे आई-वडील सातारा जिल्ह्यात शेती करतात. गेली १७ वर्षे त्या मुंबई महापालिकेत कार्यरत असून, आपल्या कामासोबत गिर्यारोहणाची आवड जोपासत आहेत. सीमा माने यांची वाटचाल हे फक्त गिर्यारोहणाचे स्वप्न नसून, ‘धैर्य, संविधानप्रेम आणि देशभक्ती’ यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
सात खंडांतील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न
सीमा माने यांचे सात खंडांतील सर्वोच्च शिखरांची मोहीम पूर्ण करणे हे ध्येय आहे. आतापर्यंत त्यांनी दोन शिखरे (किलीमांजारो व कोझियुस्को) सर केली असून, त्यांना युरोपमधील माउंट एल्ब्रुस (५६४२ मीटर – पश्चिम शिखर), उत्तर अमेरिकेतील माउंट देनाली (६१९४ मीटर), दक्षिण अमेरिकेतील माउंट एकांकवाग्वा (६९६१ मीटर), अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन (४८९२ मीटर), आशिया खंडातील आणि जगातील सर्वोच्च शिखतर माउंट एव्हरेस्ट (८८४८ मीटर) सर करण्याचे स्वप्न आहे.
देशभक्तीचा अनोखा संगम
“भारतीय संविधान हे देशाचे मूलभूत मार्गदर्शन करणारे दस्तावेज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अमूल्य आहे. त्यामुळेच मी पर्वतांवर तिरंगा फडकावतानाच संविधानाची प्रस्तावना वाचून ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या मोहिमेतून लोकांपर्यंत संविधानाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करते,” असे त्या अभिमानाने सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.