अंधेरीच्या कांदळवनात भराव वाढला!
पर्यावरणमंत्र्यांवर अनिल परब यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : अंधेरी (प.) येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाची कत्तल करून बेकायदा भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि भराव हटवून कांदळवन पूर्ववत करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी २० जुलैला दिले होते. दरम्यान, शनिवारी आमदार अनिल परब यांनी भेट दिली असून, पर्यावरणमंत्र्यांच्या भेटीनंतर भराव टाकण्याचे प्रमाण वाढले, असा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत या परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार मुंडे यांनी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. अनिल परब म्हणाले, की पूर्वी कांदळवनात ३५० एकर जमीन होती. कांदळवनात त्यावरती भरणी टाकली आहे. त्यापैकी ३५ एकर जमीन नॅशनल लॉ एज्युकेशन सोसायटीला दिली. पण त्यासोबत आणखी ३५ एकर जमीन एका बांधकाम व्यवसायिकाला दिली. त्याशिवाय कांदळवनात एक मातीची भिंत तयार केली जाते. त्यामुळे कांदळवनात येणारे पाणी थांबते आणि कांदळवन हळूहळू मरते. मग मातीचा भराव टाकून ती कांदळवनाची जागा हडप केली जोते. हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू असून, बाहेर त्याबाबत कळत नाही. याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते; परंतु त्या गेल्यानंतर भराव आणखी जोरात वाढला आहे. तिथे दररोज ४०० ते ५०० गाड्या भराव केला जात आहे. शनिवारी भेट देऊन हा प्रकार थांबवला आहे. तसेच भराव करणाऱ्यांवर गेल्या वर्षी गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सर्व यंत्रणा पैसे खाऊन भराव टाकण्यास परवानगी देत आहेत, असेही परब म्हणाले.
...
नियमांचे उल्लंघन सुरूच!
बफर झोनमध्ये कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याचे निदर्शनास आले. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याचे सांगून ही जागा काही वर्षांपूर्वी ना विकास क्षेत्रामध्ये होती, ती विकास क्षेत्रात कशी आली, असा सवाल करीत मुंडे यांनी याचा शोध घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याने या भरावाला रोख लागेल अशी अपेक्षा होती; मात्र ते कमी न होता प्रमाण वाढले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.