मुसळधारेचा परतीचा दणका
मुंबईत पाणी तुंबले; वाहतूक कोंडीचाही फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळित केले. हवामान खात्याने आधीच ऑरेंज अलर्ट दिला होता. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सकाळीही थांबायचे नाव घेत नव्हता. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले, रस्ते वाहतूक ठप्प झाली, रेल्वे रुळांवर पाणी आल्याने गाड्या उशिराने धावल्या. त्यात मोनोरेल सेवाही काही काळ बंद पडली.
सायन, दादर, परळ, कुर्ला, चेंबूर, वडाळा, माटुंगा, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, गोरेगाव, सांताक्रूझ आणि किंग्ज सर्कलसह शहर व उपनगरांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. विशेषतः अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, वरळी नाका इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. परिणामी वाहनांच्या रांगा लागल्या आणि मुंबईकरांना प्रचंड कोंडीतून प्रवास करावा लागला.
...
रेल्वे, मोनोरेल प्रवाशांची दगदग
सायन, माटुंगा, दादर, प्रभादेवी, कुर्ला येथील रेल्वे रुळांवर पाणी आल्याने लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. गर्दीच्या वेळात या विलंबामुळे प्रवाशांची चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मोनोरेललाही पावसाचा फटका बसला. चेंबूर-जेकब सर्कल मार्गावरील एक गाडी तांत्रिक बिघाडामुळे थांबली. त्यातील १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले; मात्र जवळपास दोन तास सेवा विस्कळित राहिली. अखेर दुरुस्तीनंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
...
पाणी हळूहळू ओसरले
सकाळी ११ नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने साचलेले पाणी ओसरू लागले. पालिकेने पंपाच्या साह्याने निचरा करण्याचे काम सुरू ठेवले; तरीही सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या वाहतूक कोंडीचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागला.
...
२४ तासांत मुसळधार
रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली. या २४ तासांमध्ये कुलाबा १३४.४ आणि सांताक्रूझ येथे ७३.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कुलाबा २४.७ आणि सांताक्रूझ २९.६ मिमी पाऊस झाला.
...
बसमार्ग वळवले
खार स्वामी विवेकानंद मार्गावरील नॅशनल कॉलेजजवळ पाणी साचल्याने वांद्रे तलाव-खार पोलिस ठाण्यादरम्यानचे बसमार्ग वळवावे लागले. यामध्ये ए-१, ४ मर्यादित, सी-३३, ८३, ए-८४, ए-२०२, २५५ मर्यादित आणि ए-४७३ या बसचा समावेश आहे.
...
मंगळवारसाठी इशारा
हवामान विभागाने मंगळवारसाठी (ता. १६) मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, यलो अलर्ट जारी केला आहे. तो बुधवारपर्यंत लागू असेल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज असून, त्यापुढे म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारसाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर व उपनगरांत आकाश अंशतः ढगाळ राहून जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
...
दरड कोसळली
पवई येथे शिवभगतानी मनोर सोसायटी पंचसृष्टी कॉम्लेक्स असलेल्या टेकडीवरून एक ते दोन दगड तीन चारचाकी वाहनांवर पडले. ही जागा म्हाडा प्राधिकरणाच्या अंतर्गत असून, धोकादायक दगड व मातीचा ढिगारा उचलण्याचे काम म्हाडामार्फत सुरू आहे. शहरासह उपनगरांत नऊ ठिकाणी पावसामुळे पडझड झाली. दरम्यान, कोणालाही इजा नाही. दोन ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
...
दिवसभरातील पाऊस (मिमी)
महापालिका मुख्यालय - ५१
मुंबई सेंट्रल - ४६
मानखुर्द - ८७
कांदिवली - ७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.