मुंबई

‘एआय’च्या वापरामुळे तणावाच्या संकल्पना बदलल्या

CD

विद्यार्थ्यांची समुपदेशनासाठी ‘एआय’कडे धाव
वाढत्या ताणतणावामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता


संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मोबाईलच्या अतिवापराच्या असंख्य परिणामानंतर आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाच्या संकल्पनाही बदलल्या आहेत. पालक, शिक्षक, समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांकडून ताणतणाव आणि त्यावरील उपचारांपलीकडे जाऊन विद्यार्थी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या, करिअर, आपल्या वैयक्तिक प्रश्नांसोबत असंख्य विषयातून येणाऱ्या ताणतणावासाठीच्या प्रश्नांची उत्तरे ही एआयकडे शोधत असल्याने याविषयी शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

एआयवर चांगली माहिती मिळत असली तरी ती पुरेशी नसते. अशा वेळी विद्यार्थ्यांकडून एआयवर अभ्यासक्रमांसोबत वैयक्तिक ताणतणाव, स्पर्धांबाबत माहिती विचारले जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा संवादही खुंटत चालला असून तार्किक, अनुमान काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिक्षकांपेक्षाही विद्यार्थ्यांकडून एआयचा वापर अधिक केला जात असल्याने त्यातून मिळालेल्या माहितीमुळे शिक्षकांना काही कळत नाही, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही या स्मार्ट तंत्रामुळे विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.

एआयच्या माध्यमातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विविध प्रश्न उपस्थित करतात. आपल्याला पडलेले प्रश्न आणि त्याची उत्तर शोधतात, मात्र त्यातून त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची बुद्धी खुंटीत चाललेली दिसते. यासाठी पालक, विद्यार्थी संवाद तसेच त्याच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक करीत हळूच त्याच्या उणिवा लक्षात आणून देण्याच्या गोष्टी घडणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांमध्ये भावनिक साक्षरता एआयमधून विकसित करता येत नाही. एआय वापरणे चांगले असले तरी तो वापर पुरेसा नाही. त्याच्या मर्यादा लक्षात आणून देणेही महत्त्वाचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर यांनी सांगितले.

मोबाईलवरील नियंत्रणाच्या सूचना
युनेस्कोने नुकताच ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट-२०२३’ जाहीर केला होता. त्यात अतिवापराच्या स्क्रीनटाइम व मोबाईल वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये चंचलता, आत्मनियंत्रण कमी होणे, चिंता वाढणे, भावनिक स्थैर्य कमी होणे असे परिणाम दिसत असल्याचे निष्कर्ष नोंदवले. तसेच २०२३ अखेरपर्यंत सुमारे ६० देशांच्या शिक्षण प्रणालींनी शाळेत मोबाईलवर मर्यादा घातल्या होत्या. २०२४ अखेरपर्यंत हे प्रमाण वाढून ७९ देशांपर्यंत गेल्याचेही नोंदवले. तसेच वर्गखोलीत तंत्रज्ञानाचा वापर फक्त शैक्षणिक कारणासाठी करावा. प्रत्यक्ष शिक्षक–विद्यार्थी संवाद, सामाजिक कौशल्ये व मानवी घटक यांना प्राधान्य द्यावे, अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या.
--
‘ब्रेन रॉट’ वर्षानिमित्त चर्चा
ऑक्सफर्ड डिक्शनरीने ब्रेन रॉट या शब्दाला २०२४चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले. ‘ब्रेन रॉट’ म्हणजे मेंदू गंजणे, बौद्धिक, मानसिक स्थितीतील बिघाड तसेच मोबाईलसारख्या अतिवापरामुळे झालेले परिणाम यावर जगभरात चर्चा सुरू झाल्या.
--
एआयवर विचारले जाणारे प्रश्न
अभ्यासाचे प्रश्न : अभ्यास कसा करावा, एखाद्या विषयाची संकल्पना सोडवणे. लक्ष केंद्रित कसे करावे. परीक्षेची भीती, इंग्रजी, गणित विषयातील भीती, विषय, संकल्पना न समजणे, गृहपाठ वेळेवर पूर्ण न होणे. अभ्यास लक्षात राहत नसणे.
मानसिक तणावाचे प्रश्न : परीक्षेचा ताण, अधिक गुण मिळविण्यासाठी पालकांच्या अपेक्षा. माझे मित्र पुढे जात आहेत, मी मागे पडत असल्याची भावना. आत्मविश्वासाचा अभाव. शिक्षकांकडून येणारा दबाव, क्लासेसमधील स्पर्धा
वैयक्तिक प्रश्न : मनात कोणत्यातरी विषयाची निराशा; मुली, मुले यांच्यातील स्पर्धा, आकर्षण, मोबाईल वापरामुळे निर्माण झाले प्रश्न
--
असे झाले परिणाम
- प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची बौद्धिकता
- भावनिक बुद्ध्यांक, विचार करण्याची क्षमताही मंदावली
- एआयच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये ब्रेन रॉट वाढले
- एआयमुळे विद्यार्थ्यांच्या ताणतणावाच्या संकल्पना बदलल्या
- फास्ट, जंकफूडची मोठी समस्या, हट्टपणात वाढ
- पाश्चात्त्याच्या अनुकरणामुळे स्टेटस, मुलांच्या रागीटपणात वाढ
- आपले स्थान मोठे, इतरांपेक्षा वेगळे असल्याचे दाखविण्यातून तणावामध्ये वाढ
- खेळ, संवाद कमी झाल्याने मानसिक कुंचबणा आदीतून तणाव वाढले.
--

काही पालक मुलांना अत्यंत सुरक्षेच्या वातावरणात मोठे करतात. त्यामुळे त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होऊ दिला जात नाही. दुसरीकडे अनेकदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते सामोरे जाऊन निर्णय घेऊ शकत नाहीत. यासाठी पालकांकडून वेळोवेळी विविध प्रश्नांवर मोकळेपणाने गप्पा मारायला हव्यात. यासाठीचे एक कल्चर विकसित व्हायला हवे. एखाद्या विषयावर भीती वाटत असेल तर मुलांसोबत खुलेपणाने त्यावर चर्चा केल्या, तर त्यातून ताणतणावाचे अनेक मार्ग सुकर होतील.
- डॉ. यश वेलणकर, मानसोपचारतज्ज्ञ
--

मोबाईल, एआय आदींच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्गातील उपस्थितीवर परिणाम झाले आहेत. वर्गात लक्ष देण्याची वृत्ती कमी झाली. त्यातून तार्किक विचार, अनुमान काढणे यासोबत संवाद कमी झाले. विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ कमी झाल्याने सहचर्य, सांघिक वृत्ती, परस्पर संबंध, हार स्वीकारण्याची सवय, नेतृत्वगुण विकसन, आपण मागे पडत चालत असल्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. यातील ताणतणाच्या नव्या पर्यायावर विद्यार्थी एआयसारखे तंत्र वापरतात.
- विकास गरड, शिक्षण अभ्यासक
- -
विद्यार्थ्यांमध्ये एआयचा वापर वाढत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येदेखील संवाद दुरावतोय. शिक्षकांपेक्षा मला जास्त कळते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, ही बाब गंभीर आहे. परीक्षा, अभ्यास यावरील ताण समुपदेशनाने कमी होतो. मात्र विद्यार्थ्यांच्या तणावाच्या संकल्पनाच बदलत चालल्या आहेत. शिक्षक, पालक आणि एकूणच यावर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- जयवंत कुलकर्णी, समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

Pune Crime : पत्नीच्या वेगळे राहण्याच्या मागणीला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT