दोन मजलीवरून थेट चार मजली
हाजी अली वाहनतळाचा आराखडा बदलला; भूमिगत वाहनतळाला हिरवा कंदील
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात मोठा बदल होत असून, हाजी अली येथे पूर्वनियोजित दोन मजली ऐवजी चार मजली भूमिगत वाहनतळ उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राट कालावधी वाढवण्यात आला असून, प्रकल्पाच्या खर्चातही वाढ झाली आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतच्या किनारी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यातील भाग-१ (प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस)चे काम लार्सन अँड टुब्रो लि. यांच्याकडे असून, त्यांनी २०१८ मध्ये काम सुरू केले. न्यायालयीन आदेश आणि कोरोनामुळे कामाला विलंब झाला होता. सध्याच्या मंजुरीनुसार मुख्य काम सप्टेंबर २०२५ अखेर पर्यंत, तर वाहनतळाचे काम जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे.
सुरुवातीला हाजी अली आणि अमर्सन गार्डन येथे दोन भूमिगत वाहनतळ उभारायचे ठरले होते, पण न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याशी संबंधित कामालाच परवानगी होती. त्यानंतर पालिकेने सर्वोच्च न्यायालयात विनंती केली आणि ३० सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयाने वाहनतळासाठी हिरवा कंदील दिला.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महालक्ष्मी रेसकोर्स येथे १२० एकर सार्वजनिक उद्यान आणि किनारी रस्त्याखालील हरित क्षेत्र जोडून २९५ एकर हरित पट्टा तयार करण्याचा निर्णय झाला. या पार्श्वभूमीवर भविष्यातील पार्किंगची मागणी लक्षात घेऊन हाजी अली येथील वाहनतळाचा आराखडा बदलण्यात आला आहे. दरम्यान, अमर्सन गार्डनमधील प्रस्तावित वाहनतळावर स्थानिक नागरिक आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आक्षेप घेतल्याने ते रद्द करण्यात आले आहे.
वाहतूक तज्ज्ञ व सल्लागार संस्थांच्या अभ्यासानंतर हाजी अली वाहनतळाच्या सुधारित आराखड्याचा खर्च ४७४ कोटी रुपये इतका ठरला आहे. सुरुवातीच्या ६७० कोटींच्या अंदाजाच्या तुलनेत ३३.५ कोटींची बचत होणार आहे. मूळ कंत्राटानुसार किंमत सादिलवाराची (मूळ किमतीत वाढ) मर्यादा २० टक्के होती, मात्र नवीन फेरफारांमुळे ही मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. प्रकल्पाच्या पुढील २.५ वर्षांच्या कालावधीत दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आला.
मूळ काम २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र न्यायालयीन निर्बंध, कोविड आणि आराखड्यातील बदलांमुळे विलंब झाला. सुधारित कामाला ९१४ दिवसांचा म्हणजे ३० महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला असून, आता हा प्रकल्प ३१ जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे. प्रस्तावित बदल आणि खर्च वाढीला प्रशासकांची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. स्थायी समितीचा २०१८ मधील ठराव, तसेच २०२३-२४ मध्ये झालेल्या फेरफारांच्या अनुषंगाने या सुधारित प्रकल्पाला मान्यता देण्यात येणार आहे.
हाजी अली येथील चार मजली भूमिगत वाहनतळामुळे भाविक, पर्यटक आणि स्थानिकांना पार्किंगची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. दरम्यान, प्रकल्पाचा खर्च वाढला असला तरी जुन्या दरसूचीवर आधारित मंजुरीमुळे महापालिकेची काही कोटींची बचत होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हाजी अली वाहनतळात सुविधा :
-१,०६९ कार पार्किंग
-सात दिव्यांगांसाठी राखीव
- २१४ ई-वाहन चार्जिंग)
- ४४ बस पार्किंग
- अग्निशमन व रुग्णवाहिका तसेच पोलिस वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.