मुंबईप्रमाणे चांदिवलीचाही चेहरामोहरा महायुती बदलेल
प्रवीण दरेकर यांचा विश्वास
मुंबई, ता. २२ : राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मुंबईला आकार दिला जात असून, येत्या ५-१० वर्षांमध्ये मुंबईप्रमाणेच चांदिवलीचा चेहरामोहराही महायुती बदलेल, असा विश्वास भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे व्यक्त केला.
चांदिवलीच्या प्रभाग क्रमांक १५७ चे माजी नगरसेवक भाजपचे ईश्वर तायडे यांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी दरेकर बोलत होते.
या वेळी दरेकर म्हणाले की, चांदिवलीकरांच्या मागे भाजप आणि महायुती सरकार उभे आहे. आजही संघर्ष नगरमधील लोक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. येथील लोकांना न्याय द्यायचा आहे. सत्तेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत, ते प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करायचा आहे. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे व येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेवरही भाजप महायुतीचाच झेंडा फडकेल. त्यामुळे चांदिवलीचा चेहरामोहराही आम्ही बदलू.
दरेकर पुढे म्हणाले की, गेली २५-३० वर्षे मुंबई महापालिका उबाठाच्या हातात होती. बाळासाहेब ठाकरे असताना मुंबईतील विकास होत होता, परंतु उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आल्यानंतर या मुंबईला लुटण्याचे काम झाले. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जात आहे, मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, मग उद्धव ठाकरे यांनी मराठीसाठी काय केले? त्यामुळे आता देवाभाऊंनी मुंबईतील एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही ही भूमिका घेतली. त्यासाठी अभ्यूदय नगर, बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत आहे. जनतेचा आशीर्वाद राहिला, तर येणाऱ्या ५-१० वर्षांत मुंबईचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही.
एसआरएच्या इमारतींचाही स्वयंपुनर्विकास करू
माझ्या अभ्यास गटाचा अहवाल सरकारला दिला आहे. त्यात एसआरएच्या इमारतीही स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून पुनर्विकसित करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. ती मिळाल्यावर एसआरएच्या इमारतीही स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून पुनर्विकसित करू, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.