एम. टी. अग्रवाल रुग्णालय नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार
मुलुंडमधील रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही : शेलार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुलुंड पश्चिमेतील महापालिकेचे एम. टी. अग्रवाल रुग्णालय नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असून, या रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंंत्री आशीष शेलार यांनी स्पष्ट केले. मंगळवारी (ता. २३) मंत्रालयात शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, माजी नगरसेविका समिता कांबळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेलार यांनी सांगितले, की रुग्णालयाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, २२ केव्ही विशेष वीजवाहिनीबाबत रेल्वेकडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई महापालिका आपल्या खर्चातून हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेवक गंगाधरे यांनी महापालिकेवर टीका करताना म्हटले, की रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यासाठी अनावश्यक विलंब करण्यात आला आहे.