म्हाडाच्या महामुंबईतील परवडणाऱ्या घरांसाठीच्या जागा संपल्या!
नवीन प्रकल्प हाती घेण्यावर मर्यादा; कोकण मंडळाकडून सरकारकडे ३५० हेक्टर जमिनीची मागणी, ठाणे, पालघर, पनवेलला पसंती
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : म्हाडाकडून मुंबईसह महामुंबईत सर्वसामान्यांसाठी हजारो परवडणारी घरे उभारली जात असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच होऊ घातलेल्या ग्रोथ हबमुळे भविष्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघरमधील घरांच्या मागणीत झपाट्याने वाढ होणार असल्याने म्हाडानेही येथे मोठ्या प्रमाणात घरे उभारण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या महामुंबईतील परवडणाऱ्या घरासाठीच्या मोठ्या जागाच संपल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकण मंडळाने ठाणे, पनवेल, पालघरमधील तब्बल ३५० हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
मुंबईतील घरांच्या किमती गगणाला भिडलेल्या असल्याने सर्वसामान्यांकडून ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरारमध्ये तुलनेने स्वस्त असलेल्या घरांना पसंती दिली जात आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकत्याच ठाणे, नवी मुंबईतील ५,३६२ घरांच्या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तब्बल एक लाख ८४ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी पसंती दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच भाग म्हणून कोकण मंडळाकडून आणखी गृहनिर्माण योजना राबवण्याचे नियोजन आहे. मात्र सध्या कोकण मंडळाकडे परवडणाऱ्या घरांचे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी जागाचा नसल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळेच कोकण मंडळाने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सुमारे ३५० हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात म्हणून सरकारकडे मागणी केली आहे.
सरकारी जमिनी म्हणजे काय?
म्हाडाच्या कोकण मंडळाने प्रामुख्याने ठाणे, पनवेल आणि पालघर जिल्ह्यातील सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. सरकारी जमिनी म्हणजे ज्या जमिनीचा आकार (शुल्क) संबंधिताने न भरल्याने त्या महसूल विभागाकडे जप्त केल्या जातात. त्याला आकार पड जमीन संबोधले जाते. अशा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आकार पड किंवा महाराष्ट्र शासन असा उल्लेख असतो. त्या जमिनी केवळ सरकारी प्रकल्पांसाठी देता येतात.
नाममात्र किंमत
राज्य शासनाकडून म्हाडाला दिल्या जाणाऱ्या जमिनी नाममात्र एक रुपया एवढ्या किमतीला दिल्या जातात. त्याची रीतसर खरेदी दिली जात असून, त्यासाठी सामान्यांसाठी परवडणारी घरे उभारणे बंधनकारक असते.
जमिनीच्या बदली जमीन
कोकण मंडळाकडे सध्या जमिनीची कमतरता आहे. त्यामुळे त्यांची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी गेल्यास त्या बदल्यात पैसे न घेता जमिनीच्या बदली जमिनी घेण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून कोकण मंडळाची जमीन बोरिवली-ठाणे बोगद्यासाठी चितळसर येथील जमिनी एमएमआरडीएला द्यावी लागली आहे. त्या बदल्यात पैसे न घेता नजीकचीच सुमारे २५ गुंठे जमीन घेतली जाणार आहे. तसेच विरार-अलिबाग मल्टी कॉरिडॉरसाठी म्हाडाची सुमारे साडेबारा एकर जमीन जात आहे. त्या बदल्यात पैशांऐवजी जमीन मिळावी म्हणून म्हाडा प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोकण मंडळाने मागणी केलेली जमीन
पनवेल
- आडीवली - ६.३ हेक्टर
- उसरली - १.१७ हेक्टर
- पनवेल - १३.४ हेक्टर
ठाणे
- कळवा - १८.५३ हेक्टर
- चिखलोली - ४.४५ हेक्टर
- खिडकाळी - ९.६३हेक्टर
- दापोडे - २६.०७ हेक्टर
- बापगाव - ३६.७५ हेक्टर
- ठाणे - १५.२७ हेक्टर
- ठाणे - ३९ हेक्टर
माजिवडा - १३ हेक्टर
पालघर
- वसई - ४.६६ हेक्टर
- जूचुंद्र - २० हेक्टर
- नंडोरे - ६.१७ हेक्टर
- पालघर - ११.५१ हेक्टर
- पालघर - ८९.५९ हेक्टर