मुंबईला आज ‘रेड अलर्ट’
अतिमुसळधारेचा इशारा; महापालिका यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः बंगालच्या उपसागरातील वायव्य आणि लगतच्या मध्य भागावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्रच्या दिशेने सरकत आहे. हा दाब कमी होऊन खळबळजनक स्थितीत जाण्याची शक्यता असून रविवारी (ता. २८) सकाळी मुंबईच्या दिशेने सरकणार आहे. यामुळे अतिमुसळधार पाऊस पाडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसाठी रविवारी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने थोडासा दिलासा मिळणार असला तरीही महापालिका प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर हिंदमाता, किंग सर्कल, अंधेरी मिलन, सायन, द्रुतगती महामार्गाचे पूर्व आणि पश्चिम भाग यांसह मागील पावसात पाणी साचलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या भागांत अतिरिक्त कर्मचारी वर्ग नेमण्यात आला असून, ते शनिवारपासून सोमवारपर्यंत सतत कार्यरत राहणार आहेत. महापालिकेने सर्व विभागातील साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. शहरातील परिस्थितीवर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाद्वारे सतत लक्ष ठेवले जात आहे. मुंबईभरात एकूण ४८१ ठिकाणी पाणी उपसा पंप कार्यरत ठेवण्यात आले आहेत. मुसळधार पावसातही हे सर्व पंप अखंड सुरू राहतील, याची काटेकोर काळजी घेतली जात आहे. त्यातच पाण्याचा निचरा हा भरती-ओहोटीच्या गणितावर अवलंबून असतो. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईला सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी मात्र रेड अलर्ट दिल्यामुळे अतिमुसळधारेचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. त्यानंतरही दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
नागरिकांना इशारा
पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. एकंदरीत, अतिमुसळधारेचा धोका लक्षात घेता मुंबई सज्ज, महापालिका तयार आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी (ता. २८) भरती-ओहोटीच्या वेळा
पहिली भरतीची वेळ - पहाटे ३ वाजून १८ मिनिटे, अंदाजे ३.७ मीटर उंचीवर
पहिली ओहोटीची वेळ सकाळी ८ वाजून ५६ मिनिटे, अंदाजे २.० मीटर
दुसऱ्या भरतीची वेळ दुपारी २ वाजून ४५ मिनिटे, अंदाजे ३.३ मीटर
दुसऱ्या ओहोटीची वेळ रात्री ९ वाजता, अंदाजे १.१ मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.