८५० रिक्त डॉक्टरांची पदे भरण्याचा मार्ग मोकळा
पालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणार
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः पालिका वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सुमारे ८५० रिक्त डॉक्टर आणि शिक्षकपदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे भरण्याची प्रक्रिया मंत्रालय आणि विविध विभागांकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती; परंतु आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अंतिम मंजुरी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या भरतीमुळे पालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केईएम, सायन, नायर, कूपर आणि नायर दंत रुग्णालयासारख्या प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. यामध्ये १३४ प्राध्यापक, १३१ सहयोगी प्राध्यापक आणि ५८५ साहाय्यक प्राध्यापकपदांचा समावेश आहे. दरम्यान, नाव न छापण्याच्या अटीवर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (एनएमसी) आणि भारतीय दंत परिषदेने निश्चित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करण्यासाठी पालिकेने २०२३ मध्ये राज्याच्या नगरविकास विभागाकडे (यूडीडी) एक प्रस्ताव सादर केला होता. या पात्रता प्रस्तावाला अलीकडेच विभागीय मान्यता मिळाली आहे. आता फक्त रोस्टर पडताळणी, अपंगत्व आरक्षणाची पुष्टी आणि काही तांत्रिक सुधारणा शिल्लक आहेत. यामध्ये उमेदवारांची जन्मतारीख, निवृत्तीचे वय आणि आरक्षण कागदपत्रांमधील किरकोळ चुका समाविष्ट आहेत. या दुरुस्त्या एक ते दोन आठवड्यांत यूडीडीकडे पाठवल्या जातील. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल.
बैठकांच्या अनेक फेऱ्यांनंतर गती
एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की पालिका अधिकाऱ्यांनी यूडीडी मंत्रालयातील प्रधान सचिव, सहसचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अनेक वेळा बैठका घेतल्या. अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल चहल यांच्या पुढाकारामुळे या प्रक्रियेला अलीकडेच गती मिळाली. पालिका अधिकाऱ्यांनी सुमारे १५ वेळा मंत्रालयाला भेट दिली आणि अनेक बैठका घेतल्या, त्यानंतरच ही मंजुरी शक्य झाली.
भरतीसाठी पुढील रोडमॅप
रोस्टर दुरुस्त्या आणि अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, पालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि एमएमसी बोर्डामार्फत ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करेल. साहाय्यक प्राध्यापकपदे एमपीएससी बोर्डामार्फत भरली जातील, तर सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकपदे एमपीएससीमार्फत भरली जातील. पालिका अधिकाऱ्यांच्या मते, जर सर्व दुरुस्त्या एका महिन्यात पूर्ण झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली नाही, तर भरती प्रक्रिया त्वरित सुरू होऊ शकते, अन्यथा जर निवडणूक आचारसंहिता लागू झाली, तर प्रक्रिया आणखी तीन ते चार महिने लांबू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.