युवकांमधील हृदयविकारात वाढ
जीवनशैलीत सुधारणा अत्यावश्यक : डॉ. रामकांत पांडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ‘युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि हे वैद्यकीय प्रगतीच्या पातळीवरदेखील चिंता निर्माण करणारे आहे. जीवनशैलीत सुधारणा अत्यावश्यक आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले तर आधुनिक उपचार पद्धतीही अपुऱ्या पडतील,’ असा इशारा एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पांडा यांनी दिला आहे. जागतिक हृदय दिन २०२५च्या ‘एव्हरी बीट काउंटस’ या घोषवाक्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ही चिंता व्यक्त केली.
डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले, की गेल्या दशकात ४५ वर्षांखालील तरुणांमध्ये हृदयविकारामुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे, तर भारतात २०२० ते २०२३ दरम्यान हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांपैकी जवळजवळ अर्धे रुग्ण ४० वर्षांखालील होते. डॉ. पांडा यांच्या मतानुसार, जीन एडिटिंग, प्रिसिजन मेडिसिन, एआय-आधारित स्क्रीनिंग, मिनिमली इनव्हेसिव्ह थेरपीज तसेच नवीन औषधे यासारख्या अत्याधुनिक उपायांनी हृदयविकाराचे धोके कमी करता येतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांची त्वरित तपासणी, हृदयाच्या सुरुवातीच्या लक्षणांचे योग्य निरीक्षण आणि कमी त्रासदायक उपचार शक्य झाले आहेत. परंतु, जीवनशैलीत बदल न झाल्यास धोका कायम असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम, असंतुलित आहार आणि निष्क्रिय जीवनशैली, मानसिक तणाव, व्यसनांच्या सवयी, प्रदूषण, हवामानातील तीव्र बदल, सोशल मीडिया व ओटीटीचा अतिवापर हे सर्व तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवतात. अगदी आधुनिक तंत्रज्ञान असूनही या सवयी हृदयविकार, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअरची शक्यता वाढवतात. एआयआधारित स्क्रीनिंग, हृदयविकाराच्या औषधोपचार आणि स्टेंटिंग, कॅथेटरआधारित थेरपीज यांद्वारे पुरेशा सुरक्षेची तरतूद असली तरी अचानक हृदयविकार होण्याची शक्यता कमी होत नाही, असे सांगत त्यांनी तरुणांना सावध केले आहे.
...
...वैज्ञानिक प्रगतीही अपुरी ठरेल!
डॉ. पांडा यांनी सांगितले, की शिक्षण, जीवनशैली सुधारणा, वेळेवर तपासण्या, मानसिक आरोग्य आणि सार्वजनिक धोरणात्मक उपाय अत्यावश्यक आहेत. युवा पिढीसाठी हृदयविकार प्रतिबंधक कार्यक्रम राबवणे, आहार व व्यायामाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक ताणतणाव कमी करणे हाच खरा उपाय आहे. त्यांनी शेवटी सर्वांना कळकळीचा इशारा देत सांगितले आहे, की प्रत्येक जीव खरोखर महत्त्वाचा आहे. जर तरुण पिढीने स्वतःची काळजी घेतली नाही, तर त्यांच्या संरक्षणासाठी सर्व वैज्ञानिक प्रगतीही अपुरी ठरेल.
...
धोका वाढवणारे घटक
- लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम
- असंतुलित आहार आणि निष्क्रिय जीवनशैली
- मानसिक तणाव आणि व्यसनाधीनता
- प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल
- सोशल मीडिया, ओटीटीचा अतिवापर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.