निवडणुकीआधी कामांना जोर
पालिकेकडून २० हजार कोटींच्या निविदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. मालाड परिसरातील दोन पुलांसाठी २,२०० कोटींची निविदा जाहीर झाल्यानंतर लगेचच संपूर्ण मुंबईत १,३५० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल १७,७३३ कोटींची कामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालाड पश्चिमेतील लिंक रोड ते मढ खाडी परिसर जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे लगून रोड आहे. लगून रोड ते इन्फिनिटी मॉल या ३८० मीटर अंतरावर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल हा केवळ वाहतूक सुलभ करणारा नाही तर मुंबईतील वास्तुशास्त्रीय महत्त्वाचे ठिकाण ठरेल, असा दावा करण्यात येत आहे. याशिवाय आणखी एक उंच मार्ग उभारण्यात येणार असून, लिंक रोडवरील वाहतूक कोंडीला काही प्रमाणात दिलासा मिळेल.
मुंबई महापालिकेकडून मुंबईतल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. यातील ६० टक्के रस्ते तयार झाले असून पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी तुंबू नये, यासाठी ही कामे बंद करण्यात आली होती. आता पावसाळा ओसरत असल्याने पावसाळ्यानंतर तत्काळ काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मॉन्सून संपल्यानंतर महापालिकेने १,३५० रस्त्यांचे (३६५.४४ कि.मी.) काँक्रीटीकरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांसाठी १७,७३३ कोटी रुपये राखीव ठेवले आहेत.
एकीकडे मुंबईकरांना दररोज खड्डे, पाणी साचणे, बससेवेची कमतरता अशा मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे; तर दुसरीकडे महापालिकेकडून हजारो कोटींचे ‘भव्य’ प्रकल्प जाहीर केले जात आहेत. त्यामुळे खरे लाभ मुंबईकरांना होणार की कंत्राटदारांच्या खिशात पैशांचा पाऊस पडणार, असा प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निविदा आणि कामांचा पाऊस पडू लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हे प्रकल्प जनतेच्या हितासाठी आहेत की फक्त निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेली घोषणा आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसने महायुती सरकारमधील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणली आहेत. खड्डे, अपुरा पाणीपुरवठा, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना महापालिका प्रशासन मात्र ठेकेदारांना खूश करणारे कोट्यवधींचे प्रकल्प आणत आहे. जनता त्रस्त आणि महायुती सरकार मस्त असे चित्र सध्या दिसत आहे.
- सुरेशचंद्र राजहंस,
मुख्य प्रवक्ता, काँग्रेस
ठेकेदारांना खुश करणारे मोठमोठे प्रकल्प आताच सुरू करण्याची खरेच गरज आहे का, याचा विचार पालिका प्रशासनाने करायला हवा. अशाने महापालिका प्रशासन दिवाळखोरीच्या दिशेने जाण्याची भीती आहे. सरकारच्या दबावात आवाक्याबाहेरचे मोठे प्रकल्प आणणे योग्य नाही. ठेकेदारांसाठीच या घोषणा होत असल्याचे दिसते.
- गॉडफ्रे पिमेंटा, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.