मुंबई आमच्या हक्काची..!
शिवसैनिकांच्या घोषणांनी शिवाजी पार्क दणाणले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे गुरुवारी (ता. २) शिवाजी पार्क भगव्या लाटेने व्यापले होते. ‘मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पावसाची तमा न बाळगता भिजत ठाकरेंचे शिवसैनिक मेळाव्याला पोहोचले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानेही शिवसैनिकांचा उत्साह कमी केला नाही. पावसाचे आव्हान बाळगत उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मैदान गाठले, काहींनी छत्री घेऊन, काहींनी भगवी टोपी, भगवा फेटा डोक्यावर बांधून तर काहींनी प्लॅस्टिकच्या पिशव्या डोक्यावर घालून मेळाव्याला हजेरी लावली. शिवाजी पार्कच्या आसपास दादर परिसरात शिवसैनिकांची भगवी लाट पसरली होती. मुंबईसह नवी मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. या वेळी शिवसेनेचे उपनेते आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे म्हणाले, ‘पावसामुळे शिवसैनिकांचा उत्साह आणखी वाढला आहे. आम्ही मोठी वादळे झेलली आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वादळांना आम्ही सहजच तोंड देऊ शकतो. आमचा विश्वास बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आहे.’
मुंबई फक्त मराठी माणसाची, मराठी-हिंदी, गुजराती आणि महापालिका निवडणूक हेच विषय शिवसैनिकांच्या चर्चेत होते. मुंबई आणि मराठी माणसाला ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही. कुणी कितीही जोर लावला किंवा पक्ष फोडले तरी मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचीच मशाल पेटेल, असा विश्वास शिवसैनिकांच्या बोलण्यात जाणवत होता.
मुंबईत पाऊस, वादळ किंवा कोणताही अडथळा आला तरी, शिवसैनिकांचा उत्साह कमी होणार नाही. आम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ. मुंबई आमची आहे, हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. येणाऱ्या महापालिका निवडणूक आम्ही जिंकून दाखवणार आणि शिवसेनेचा भगवा झेंडा प्रत्येक गल्लीत फडकणार आहे. आजच्या मेळाव्याने स्पष्ट झाले, की शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाहीत.
- केदार दिघे, उपनेते, शिवसेना ठाकरे गट
मुंबईत फक्त शिवसेनेची चालणार आहे. मुंबई आमची हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही! भर पावसात या मेळाव्याला येऊन शिवसैनिकांनी पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिले की शिवसेना अजूनही सर्वांच्या हृदयात आहे.
- हनुमंत खंडागळे, विभागप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
शिवसेना यंदाची महापालिका निवडणूक जिंकून महापालिकेवर भगवा फडकवणार आहे. आमचा एकच उद्देश स्पष्ट आहे, मुंबईमध्ये भगवा फडकवणे आणि शिवसेनेचा ठसा कायम ठेवणे. तो आम्ही ठेवणारच.
- विशाल भोईर, उपविभागप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
भगव्या झेंड्याखाली सर्वत्र एकत्र येऊन, आम्ही शिवसेनेचा ठसा कायम ठेवणार आहोत. यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भगवा झेंडा फडकवणार.
- आदित्य सकपाळ, शिवसैनिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.