‘श्रीवल्ली’ने दिला पाच बछड्यांना जन्म
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवे पाहुणे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात श्रीवल्ली वाघिणीने २ ऑक्टोबर रोजी पाच बछड्यांना जन्म दिला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच एका वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत श्रीवल्ली गर्भवती राहिल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान यंदा तिला पाच बछडे असल्याची खात्री उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. २ ऑक्टोबर रोजी श्रीवल्लीने पाच बछड्यांना जन्म दिला. दोन वर्षांपूर्वी श्रीवल्ली वाघिणीची पहिल्यांदा प्रसूती झाली. पहिल्यांदाच प्रसूतीचा अनुभव असलेल्या श्रीवल्लीचा केवळ एक बछडा वाचला. गेल्या वर्षी श्रीवल्ली वाघिणीने दुसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिला. चार बछड्यांपैकी एका बछड्याचा मृत्यू झाला. तिसऱ्या वेळी पहिल्यांदाच श्रीवल्लीने पाच बछड्यांना जन्म दिल्याने उद्यान प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत.
श्रीवल्ली आणि बाजीराव
श्रीवल्ली या वाघिणीला टी २४-सी २ म्हणूनही ओळखले जाते. तिचा जन्म ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात झाला. नंतर तिला महाराष्ट्रातील चंद्रपूरजवळील मोहर्ली पर्वतरांगेत स्वतःचा प्रदेश स्थापन करण्यास प्रोत्साहित केले गेले. त्या काळात ती पाळीव प्राण्यांची शिकार करत असे. फेब्रुवारी २०२२ मध्ये या वाघिणीने दोन लोकांना मारल्याचा आरोप आहे. नंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून या वाघिणीला मार्च २०२२ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे आणण्यात आले, तर बाजीरावने चंद्रपूरमधील राजुरा येथे २१ महिन्यांच्या कालावधीत आठ लोकांना मारले होते. त्यानंतर २०२० मध्ये चंद्रपूर सर्कलमधील राजुरा वन विभागाने त्याला पकडले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे आणले.
काळ्या बिबट्याच्या बछड्यावर उपचार
रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे ऑगस्टमध्ये देवरुख-रत्नागिरी रस्त्यावर काळ्या बिबट्याचे बछडा आढळून आले होते. अंदाजे वर्षभराचा नर बिबट्या उपासमारीमुळे रस्त्यावरच निपचित पडून होता. देवरुख येथील प्राथमिक उपचार केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू होते. आता या बिबट्याच्या बछड्याची रवानगी सातारा येथील कराडमधील वन्यजीव उपचार केंद्रात करण्यात आली. तिथे महिनाभर उपचार दिल्यानंतर बिबट्याच्या पिल्लाला मुंबईत हलवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
श्रीवल्ली वाघिणीने २ ऑक्टोबर रोजी पाच बछड्यांना जन्म दिला. त्याचवेळी डॉ. निखिल बनगर यांनी उद्यानात काळ्या बिबट्या आणला. त्यांच्या देखरेखीखाली बिबट्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या पंज्याला जखम आहे. बिबट्याच्या या बछड्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील.
- किरण पाटील, विभागीय वनाधिकारी, दक्षिण विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान