पालघर साधू प्रकरण सीबीआयकडे देण्यास तीन वर्षे का लागली?
सचिन सावंत यांचा भाजपला सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः भाजप सरकारने सीबीआयचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला पाच वर्षे लागली, आता पालघर साधू हत्येच्या प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा सवाल त्यांनी केला.
सावंत म्हणाले, की पालघर साधू हत्येचा तपास महाविकास आघाडी सरकारने पूर्णपणे केला होता आणि साधूंचा मृत्यू हा गैरसमज आणि अफवेमुळे झालेल्या हल्ल्यात झाला होता. आरोपींमध्ये काही भाजपचे कार्यकर्तेही असल्याचे नमूद करून त्यांनी विचारले, हीच घटना ‘धर्मवीर २’ चित्रपटात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दाखवली गेली. तर मग ही केस सीबीआयकडे देण्यास तीन वर्षे का लागली? महायुती सरकारने ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सीबीआय तपास जाहीर केला; पण प्रत्यक्ष आदेश ६ फेब्रुवारी २०२४ला आणि कलमे बदलून सुधारित आदेश मे २०२५ला काढला. शेवटी ८ ऑगस्ट २०२५ला प्रकरण सीबीआयकडे गेले. हा विलंब संशयास्पद असल्याचे सावंत म्हणाले.
.........