अमली पदार्थ तस्कर रडारवर!
आता परदेशातही थारा नाही; पाच महिन्यांत चार प्रमुख आरोपींचे प्रत्यार्पण
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः गेल्या पाच महिन्यांत परदेशात दडून भारतात अगदी सहजरीत्या अत्यंत घातक अशा रासायनिक अमली पदार्थांच्या उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या गुन्ह्यांत सहभागी चौघांना मुंबई गुन्हे शाखा, अमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. या विशेष रणनीतीमुळे परदेशातील म्होरके, प्रमुख साथीदार आणि त्यांच्या भारतातील संघटित टोळ्यांना पळता भुई थोडी झाल्याचे चित्र आहे.
गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, अमली पदार्थविरोधी पथकाचे उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या पाठपुराव्यामुळे जून महिन्यापासून ताहीर डोला, मुस्तफा कुब्बावाला, सोहेल शेख ऊर्फ लॅविश आणि सलमान शेख या चार प्रमुख गुन्हेगारांचे संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पण झाले. यातील ताहीर, मुस्तफा आणि सोहेल हे अमली पदार्थ तस्कर सलीम डोलाचे अत्यंत निकटवर्ती आहेत.
गेल्यावर्षी गुन्हे शाखेच्या घाटकोपर कक्षाने सांगली येथील मेफेड्रॉन अर्थात एमडी या अमली पदार्थाचे उत्पादन घेणारा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या गुन्ह्याच्या चौकशीत मुंबई महाराष्ट्रासह गुजरात येथून डझनभर आरोपींना अटक केली. त्यात उत्पादन घेणाऱ्यांपासून आर्थिक रसद पुरवणारे, वाहतुकीसह साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांच्या चौकशीतून म्होरक्या सलीम आणि त्याच्या परदेशात दडून भारतातील संघटित टोळी हाताळणाऱ्या साथीदारांची माहिती पुढे आली. हे आरोपी कोणत्या देशात दडून आहेत, याची नेमकी माहिती काढून सहआयुक्त गौतम यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) इंटरपोलद्वारे या आरोपींविरोधात जगभर रेडकॉर्नर नोटीस जारी करून घेतली. त्या आधारे संयुक्त अरब अमिरातीतील अमली पदार्थविरोधी यंत्रणेने या आरोपींना अटक केली आणि टप्प्याटप्याने भारतात पाठवले.
परदेशात दडलेल्या अन्य आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी असून त्यांच्या अटकेसाठी, प्रत्यार्पणासाठी पाठपुरावा सुरू आहे. ज्या ज्या परदेशी आरोपींचा सहभाग उघड होईल त्यांना भारतात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
परदेशी दडलेल्यांची पळापळ
परदेशात विशेषतः संयुक्त अरब अमिराती, दक्षिण पूर्व आशिया खंडातील देशांमध्ये दडून, तिथे कायमचा थारा मिळवून भारतात अमली पदार्थांचे उत्पादन ते विक्रीपर्यंतची गुन्हेगारी सहज करता येते, हा या म्होरक्यांचा, प्रमुख आरोपींचा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यामुळेच परदेशात दडून बसलेल्या म्होरक्यांची पळापळ झाली. प्रत्यार्पण सत्र सुरू झाल्यानंतर सलीम डोला दुबई सोडून तुर्कस्थानमध्ये पळाला. कदाचित त्याने तेथूनही त्यास अन्य देशात चोरटा आश्रय घेतला असावा.
म्होरके सुरक्षित नाहीत मग आपले काय?
परदेशातील म्होरके सुरक्षित नाहीत मग आपले काय, ही भावना या टोळ्यांच्या भारतीय साथीदारांमध्ये रुजू लागली असून त्यांचीही पळापळ सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई, महानगर प्रदेशासह राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये बिनदिक्कत ठाण मांडलेले साथीदार अन्य राज्यांच्या आश्रयास गेले. दोनच दिवसांपूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाने ओडिशा येथून अहमद खान यास अटक केली. ठाणे पोलिसांनी मोक्कानुसार त्यास अटक केली होती. त्या खटल्यातून जामिनावर सुटताच त्याने पुन्हा अमली पदार्थ विक्रीस सुरुवात केली; मात्र अलीकडे मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवायांमुळे तो ओडिशा येथे पसार झाला होता.
एमडी उत्पादनासाठी कारखान्यांची उभारणी
प्रत्यार्पित झालेल्यांमध्ये ताहीर हा सलीमचा मुलगा आणि मुस्तफा पुतण्या आहे. तर सोहेल अत्यंत निकटवर्ती साथीदार आहे. भारताच्या किमान सहा ते सात राज्यांमध्ये एमडी उत्पादनासाठी कारखान्यांची उभारणी, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची जमवाजमव, वाहतूक, साठवणूक आणि विक्रीत गुंतलेल्या संघटित टोळीवर नियंत्रण आदी जबाबदारी सोहेलवर होती. या तिघांसह सुमारे १४ आरोपींच्या अटकेमुळे सलीम डोलाची भारतातील टोळी उद्ध्वस्त झाल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे.
मोक्कानुसार कारवाया
नशामुक्त भारत अभियानांतर्गत राज्य सरकारने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोक्का या अत्यंत कठोर कायद्यानुसार कारवाईस मंजुरी दिली. त्यानंतर मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने राज्यात पाहिली कारवाई केली आणि त्यात आरोपपत्रही दाखल केले आहे. भविष्यात अशा कारवायांमध्ये वाढ होऊ शकेल. तसे झाल्यास अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवणे दुरापास्त होईल, फरार आरोपींची मालमत्ता जप्त होऊ शकेल, गुन्हा शाबीत झाल्यास कठोर शासन होऊ शकेल, त्यामुळे या कारवाईचा धाकही टोळ्यांवर आहे.
प्रतिबंधात्मक ताबा
अमली पदार्थ तस्कर टोळी प्रमुखास किमान एक वर्षासाठी प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात आहे. अशी कारवाई झाल्यास आरोपीला अन्य राज्याच्या मध्यवर्ती कारागृहात किमान एक वर्षासाठी बंद करता येते. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या फैजल शेख या टोळी प्रमुखाचा प्रतिबंधात्मक ताबा घेत त्यास दक्षिण भारतातील तुरुंगात डांबले. मुंबईच्या कारागृहातून त्याने आपली गुन्हेगारी सुरू ठेवली होती; मात्र दक्षिण भारतातील कारागृहात डांबल्यानंतर त्याच्या हालचालींना पूर्णपणे चाप लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.