पीएनजी ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ
मुंबई, ता. १३ : सोने, चांदी आणि हिरे दागिन्यांचे निर्माते पीएनजी ज्वेलर्सला नुकत्याच संपलेल्या तिमाहीतील नफ्यात मागील वर्षीपेक्षा दुप्पट वाढ मिळाली आहे. त्यांना या तिमाहीत ७९ कोटी ३१ लाख रुपये नफा मिळाला.
कंपनीतर्फे नुकतेच जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील निकाल जाहीर करण्यात आले. त्यांना मागील वर्षीच्या याच तिमाहीत ३४ कोटी ९२ लाख रुपये नफा मिळाला होता. त्यात यावर्षी ११७.१ टक्के वाढ झाली, तर याआधीच्या तिमाहीत त्यांना ६९ कोटी रुपये नफा मिळाला होता. त्यांना या तिमाहीत २,१७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत त्यांना २,००१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. या वर्षाच्या मागील तिमाहीत त्यांना १,७१४ कोटी रुपये महसूल मिळाला. यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत त्यांना ३,८९२ कोटी रुपये महसूल, तर १४८ कोटी रुपये करोत्तर नफा मिळाला. त्यांचा प्रत्येक दुकानामागील सरासरी महसूल ६१ कोटी रुपये झाला आहे, तर प्रत्येक दुकानामागील सरासरी निव्वळ नफा दोन कोटी ३६ लाख रुपये झाला आहे.
कंपनीच्या दुकानांना भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या २० टक्के वाढली असून, त्यातील ९३ टक्के ग्राहक काही ना काही खरेदी करतात, असेही आढळून आले आहे. सणासुदीच्या कालावधीत राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांमुळे ग्राहकवर्ग वाढला. नवरात्रीत आतापर्यंतची सर्वोच्च म्हणजे ४२८ कोटी रुपयांची विक्री झाली. ती मागील वर्षापेक्षा ६६ टक्के जास्त होती. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहारात मूल्याचा विचार करता मागील तिमाहीपेक्षा २४ टक्के वाढ झाली, तर याच कालावधीत चांदीच्या दागिन्यांच्या व्यवहार मूल्यातही ९२ टक्के वाढ झाली. हिरे, दागिन्यांच्या विक्रीचे मूल्य ३१ टक्के वाढले, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.