म्हाडाच्या दिंडोशीतील शिवधाम कॉम्प्लेक्सला मिळाली ओसी
२०२४ मधील ८९ लॉटरी विजेत्यांना घराचा ताबा मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाने ऑगस्ट २०२४ मध्ये काढलेल्या लॉटरीत दिंडोशी येथील शिवधाम कॉम्प्लेक्समधील घरांसाठी विजेते ठरलेल्यांना खुशखबर आहे. येथील ८९ घरे असलेल्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. त्यामुळे संबंधितांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया म्हाडाने सुरू केली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात २०३० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये १३२७ घरे होती, तर उर्वरित घरे बंधकामाधीन होती. त्यामुळे या घरांचा ताबा अद्याप विजेत्यांना मिळू शकला नव्हता. यात दिंडोशीतील शिवधाम काॅम्पलेक्स आणि शिवनेरी गृहनिर्माण संस्था येथील इमारतींसह अन्य ठिकाणच्या घरांचा समावेश होता. दरम्यान, काही घरांची ओसी याआधीच आल्याने संबंधितांना घराचा ताबा दिला आहे, मात्र ओसीअभावी शिवधाम येथील ८९ आणि घरांसाठी विजेते ठरलेल्यांना घराची प्रतीक्षा होती. दरम्यान, या इमारतीला नुकतीच ओसी मिळाल्याने संबंधितांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात २५ टक्के पैसे भरण्याबाबत पत्र दिल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) गोपीनाथ ठोंबरे यांनी दिली.
आर्थिक बोजा पडू नये म्हणून खबरदारी
सोडतीत यशस्वी झालेल्या विजेत्यांवर घराचा ताबा मिळण्याआधी आर्थिक बोजा पडू नये, यासाठी म्हाडाने खबरदारी म्हणून भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच देकरपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या दीड वर्षात ज्या इमारतीला ओसी मिळालेली नाही, त्या ठिकाणीच्या विजेत्यांकडून म्हाडाने कोणतीही रक्कम घेतलेली नाही.