रुग्णालय प्रशासनाविरोधात बोंबाबोंब
बोनसच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : महापालिकेच्या आरोग्य विभागातील रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांना सलग दोन वर्षांपासून दिवाळी सणाचे सानुग्रह अनुदान (बोनस) न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १८) बोंबाबोंब आंदोलन केले.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २००९पासून रोजंदारी कामगार आणि २०१७ पासून बहुउद्देशीय कामगार किमान वेतनावर सेवेत आहेत. त्यांना २०२३मध्ये दिवाळी सणासाठी पाच हजार रुपये ठोक बोनस देण्यात आला. मात्र त्यानंतरच्या २०२४साठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी बोनससाठी मान्यता दिल्याचे जाहीर करूनही आरोग्य विभागाकडून प्रस्ताव वेळेत पाठवला गेला नसल्याने कामगारांना बोनस मिळाला नाही. यंदाही मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी बोनस देण्यास मान्यता दिली आहे. महापालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संचालकांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. तरीसुद्धा गेल्या वर्षाचे व यंदाचे असे दोन वर्षांचे सानुग्रह अनुदान अद्याप थकीत असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
दुर्लक्ष केल्याने आंदोलन
नायर दंत महाविद्यालयातील कामगारांनी आयुक्त डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. विनीत शर्मा, उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे आणि संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांना भेटून तसेच पत्रव्यवहार करून थकीत बोनससाठी वारंवार विनंती केली; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला गेल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले. या आंदोलनानंतर सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका मुख्य रुग्णालय संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांच्याकडून देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.