पालिका रुग्णालयातील प्रतीक्षा यादी कमी होणार
नव्या वर्षात मिळणार चार अत्याधुनिक एमआरआय मशीन; सातव्यांदा निविदा जारी
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई महापालिकेची प्रमुख चार रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उच्च दर्जाचे एमआरआय मशीन खरेदीचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील विविध पालिका रुग्णालयांतील चाचण्यांसाठीची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. या मशीन खरेदीसाठी सातव्यांदा निविदा काढली गेली असून, आता फाइल अंतिम टप्प्यात आहे. त्यावर पालिका आयुक्तांची स्वाक्षरी बाकी आहे, असे सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात महाविद्यालयांना चार एमआरआय मशीन मिळतील; मात्र तोपर्यंत केईएम आणि नायरसाठी खासगी लॅबसोबत करार केला जाणार आहे. ज्या खासगी लॅबला हा करार करण्यात स्वारस्य असेल (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) अशासोबत तात्पुरता करार केला जाणार आहे. यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होईल, असे मत रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केले.
प्रतीक्षा यादी कमी करण्यावर भर
खासगी रुग्णालयांत मशीनची खरेदी थेट केली जाते. एका ठरावीक बजेटमध्ये गरजेनुसार बदल करून मशीन खरेदी प्रक्रिया केले जाते. रुग्णालय संचालक मंडळाअंतर्गत हे निर्णय तातडीने घेतले जातात. पालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहे. केईएम रुग्णालयातही एक मशीन कार्यरत आहे, मात्र ते जुने आहे. सद्य:स्थितीत एक एमआरआय काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी सुमारे आठ ते नऊ महिन्यांचा आहे. मशीन नसल्याने आणि जुन्या मशीनमुळे योग्य पद्धतीने काम होत नाही. यामुळे रुग्णांची गैरसोय होते आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञानापासून वंचित राहावे लागते.
खरेदीतील अडचणी
मध्यवर्ती खरेदी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की संबंधित विभाग, निविदा विभाग, रुग्णालय प्रशासन आणि उपायुक्तांनी विविध पातळ्यांवर मंजुरी दिल्यानंतर एमआरआय खरेदीची फाइल आता अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठवली जात आहे. एका आठवड्यात मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. मंजुरीनंतर एक दर परिपत्रक जारी केले जाईल. या निविदेतदेखील फक्त एकच पात्र बोलीदार होता. तांत्रिक किंवा किमतीच्या समस्यांमुळे मागील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, परंतु या वेळी इतर रुग्णालयांच्या तुलनेत दरांवर पुन्हा चर्चा केली गेली. त्यानंतर मशीनची किंमत ठरवण्यात आली.
४० कोटींचे एक मशीन
अधिकाऱ्यांच्या मते, एकूण चार एमआरआय मशीन खरेदी केल्या जात आहेत, ज्याची एकूण किंमत १८० ते १९० कोटी रुपये आहे. याचा अर्थ एका मशीनची किंमत सुमारे ४० ते ४१ कोटी रुपये असेल. त्यात सात वर्षांचा सीएमसी आणि तीन वर्षांची वॉरंटी असेल. सर्व मशीन उच्च दर्जाच्या असून, तीन टेस्ला मशीन्स खरेदी केल्या जात आहेत.
केईएमला खासगी लॅबचा विळखा
पालिकेच्या सर्वात रुग्णसंख्या असलेल्या केईएमच्या रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात किमान चार ते पाच मोठ्या खासगी एमआरआय, सीटी स्कॅन आणि इतर रक्त चाचण्या करणाऱ्या लॅब आहेत. तसेच नायरच्या बाजूच्या परिसरातही एक ते दोन खासगी लॅब आहेत. या खासगी लॅबला दिवसाला किमान १० ते २० एमआरआय चाचण्या केल्या जातात. पालिका रुग्णालयात चाचण्यांसाठी सरासरी कालावधी अधिक लागतो. त्यामुळे नाइलाजाने अनेक रुग्ण या लॅबमध्ये येतात.
एमआरआय मशीनची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षी सुरुवातीला मशीन येऊ शकते.
– डॉ. नीलम अंद्राडे,
संचालिका, प्रमुख पालिका रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.