कलिना संकुलात सौरऊर्जा प्रकल्प
मुंबई विद्यापीठाची २०० किलोवॉट क्षमतेसह हरित ऊर्जेकडे वाटचाल
मुंबई, ता. २० : मुंबई विद्यापीठाने शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हरित ऊर्जा वापराच्या दिशेने आपली वाटचाल अधिक वेगवान केली आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे या त्रिसूत्री उद्दिष्टांनुसार विद्यापीठाने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे उप परिसर आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अप्लायड सायन्सेस कल्याण येथे यशस्वीरीत्या सौरऊर्जा प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर आता कलिना संकुलात २०० किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला सुरुवात होत आहे.
कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, फिरोजशाह मेहता भवन, सी. डी. देशमुख भवन, जुने लेक्चर कॉम्प्लेक्स, लाइफ सायन्स इमारत, मौलाना अब्दुल कलाम भवन आणि जीवभौतिकशास्त्र विभागात पूर्णतः अक्षय ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. या इमारतींमध्ये सौरऊर्जेवर आधारित विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी कॉमेट इंडिया आणि युनाटेड वे मुंबई या दोन संस्थांसोबत मुंबई विद्यापीठाने नुकतेच सामंजस्य करार केले आहेत.
कलिना संकुलातील पहिल्या टप्प्यात २०० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यामुळे कॅम्पसचा मोठा भाग अक्षय ऊर्जा स्रोतांवर चालणार असून, वार्षिक वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने दरवर्षी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा हेतूही साध्य केला जाणार आहे. या सातही इमारतींमध्ये सौरऊर्जेच्या वापरामुळे महिन्याला चार लाखांहून अधिक वीज खर्च कमी होणार आहे. २०० किलोवॅट क्षमतेच्या या सौर प्लांटमधील नेट मीटरिंग प्रणालीच्या माध्यमातून अतिरिक्त ऊर्जाही विकसित करून त्याचे नियोजन केले जाणार आहे. साधारणपणे २०० किलोवॉट सोलर पॅनल प्रणाली पॅनलचा उपयोग करून प्रतिवर्षी २,६०,००० युनिट वीजनिर्मिती निर्माण केली जाऊ शकणार आहे.
----------------
प्लॅस्टिक बॉटल श्रेडिंग मशीन
विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्लॅस्टिक बॉटल श्रेडिंग मशीन बसवण्यात आले आहे. वापरलेल्या प्लॅस्टिक बाटल्या पुनर्वापरासाठी थेट वर्गीकृत स्वरूपात देण्यास या मशीनचा उपयोग होणार आहे. या उपक्रमामुळे कॅम्पसमधील प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रभावी नियंत्रण मिळणार असून, पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन मिळणार आहे. ‘ग्रीन कॅम्पस’च्या धर्तीवर विद्यापीठाने शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
----------------
मुंबई विद्यापीठाची ही हरित ऊर्जेकडे वाटचाल पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा वापर आणि शाश्वत विकास या तिन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरत असून, पुढील काळात कॅम्पस अधिक पर्यावरणस्नेही बनविले जाणार आहे. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प आणि पर्जन्यजल संधारणाच्या सुविधांमुळे कॅम्पस अधिक शाश्वत स्वरूपात विकसित होत आहे. ‘ग्रीन कॅम्पस’च्या अंतर्गत ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण आणि वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवला जात असून, पर्यावरण जनजागृतीसाठी क्लायमेट स्कील प्रोग्राम्स हाती घेण्यात आले आहेत.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.