‘डायबेटिक फूट’ टाळण्यासाठी ‘जेजे’त क्लिनिक
सरकारी रुग्णालयात पहिल्यांदाच प्रतिबंधात्मक उपचार
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः भारतात मधुमेहाचे रुग्ण वाढत असून एकूण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सरासरी २० ते २५ टक्के रुग्णांना डायबेटिक फूट हा आजार असतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांचा पाय कापावा लागतो; मात्र डायबेटिक फूटवर प्रतिबंधात्मक उपाय व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयात ‘डायबेटिक फूटकेअर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा गोरगरिबांना होणार आहे.
मधुमेही रुग्णांमध्ये पायाची संवेदना कमी होणे, रक्तपुरवठा घटणे आणि संसर्गाचा धोका वाढणे, या तिन्ही कारणांमुळे किरकोळ जखमही मोठी बनते. त्यामुळे पुढे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी शल्यचिकित्सा विभागाने स्वतंत्र ‘डायबेटिक फूटकेअर क्लिनिक’ सुरू केले असून या उपक्रमाचे नेतृत्व शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रद्धा अभिजित धेंडे करीत आहेत. प्राध्यापक डॉ. गिरीश बक्षी आणि अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक उपचार आणि प्रतिबंधात्मक सेवा रुग्णांना देण्यात येत आहेत.
मधुमेहामुळे होणारी मायक्रो-एंजिओपॅथी (रक्तपुरवठा कमी होणे), न्यूरोपॅथी (संवेदना कमी होणे) आणि संसर्ग ही डायबेटिक फूटची प्रमुख कारणे आहेत. टिश्यूमधील साखर वाढल्याने बॅक्टेरिया जलद वाढतात आणि वॅरिकोज वेन्ससारख्या स्थितींमध्ये जखम न भरता वाढत जाते. जोखीम जास्त असलेल्या रुग्णांना वेळेत ओळखून अल्सर होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय देणे, हा या क्लिनिकचा केंद्रबिंदू आहे.
रुग्णांना प्रशिक्षण
रुग्ण शिक्षणासाठी स्वतंत्र फोल्डर तयार करण्यात आले आहेत. पायाची दररोज तपासणी कशी करावी, योग्य पादत्राणे कोणती, प्राथमिक उपचार कोणते हे सर्व मार्गदर्शन दिले जाईल. स्वतंत्र ओपीडीत दररोज चार ते पाच रुग्ण तपासले जातात, तर गंभीर रुग्णांसाठी सहा खाटांची सुविधा उपलब्ध आहे.
उपचार काय?
आधुनिक उपचारांत हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी, निगेटिव्ह प्रेशर वुंड थेरपी, एलजी-नेट बेस्ड ड्रेसिंग, सिल्वर व कॉलजन ड्रेसिंग तसेच गरजेनुसार प्लॅस्टिक सर्जरीद्वारे स्किन ग्राफ्टिंगचा समावेश आहे. डीपीडीसी ग्रँटमधून मिळालेल्या किटमुळे हे सर्व उपचार रुग्णांना पूर्णपणे मोफत मिळतात. बाहेर याच उपचारांचा खर्च प्रतिदिन १० ते २० हजार रुपये येतो.
फॉलोअपसाठी आठवड्यातून ठरावीक दिवशी रुग्णांना जखम तपासता येईल. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढणे किंवा दाखल करण्याची गरज भासणे टाळता येईल. सध्या २० ते २५ टक्के मधुमेही रुग्णांना आयुष्यात कधीतरी ‘डायबेटिक फूट’ होऊ शकते. वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेतली, तर पाय वाचविणे पूर्णतः शक्य आहे, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
भारत आता मधुमेहाचे केंद्रस्थान झाले आहे. आपत्कालीन येणाऱ्या रुग्णांमध्ये डायबेटिक फूट आढळतो. रुग्णांना माहिती नसल्याने ते उशिरा उपचारांसाठी पोहोचतात. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हे क्लिनिक महत्त्वाचे आहे.
- डॉ. गिरीश बक्षी, प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभाग, जेजे रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.