जे. जे.च्या सुपर स्पेशालिटी प्रकल्पाची तिसरी डेडलाइन चुकणार
मार्चनंतरही काही कामे अपूर्णच राहणार; संपूर्ण प्रकल्पाला आणखी वर्षभराचा कालावधी
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : जे. जे. रुग्णालयाचा अतिशय महत्त्वाकांशी सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्पाची तिसरी आणि अंतिम मुदत डिसेंबर २०२५ आता निश्चितपणे चुकण्याची शक्यता आहे. विविध विभागांचे काम मार्चनंतरच टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करता येईल, असे अभियंता विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
चुकलेल्या मुदती
पहिली मुदत २०२३ आणि दुसरी मुदत २०२५ चुकल्यानंतर तिसरी अंतिम मुदतीची मर्यादा निश्चित करण्यात आली होती; मात्र बांधकामाचा सध्याचा वेग पाहता ही वेळमर्यादा पूर्ण करणे शक्य नाही. काही अधिकाऱ्यांनी सूचित केले की संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकतो.
सुपरस्पेशालिटी सुविधा
या रुग्णालयात २५ ऑपरेशन थिएटर्स, कॅथलॅब, एंडोस्कोपी सूट्स, आणि विविध आयसीयूंसह २८ ते ३० सुपर स्पेशालिटी विभाग उभारण्याची योजना आहे. त्यात कार्डिओलॉजी, कार्डिअक सर्जरी, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, पिडियाट्रिक सर्जरी, एंडोक्राइन, जीआय आँकोलॉजी आदी विभागांचा समावेश आहे. सद्यस्थितीत १४ विभाग कार्यरत असले तरी उर्वरित विभागांसाठी आवश्यक उपकरणे, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक प्रणाली बसविण्यासाठी इमारत पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे.
फिनिशिंगचे काम प्रगत अवस्थेत
चार विंगपैकी ए आणि बी विंगचे अंतर्गत फिनिशिंगचे काम सर्वाधिक प्रगत अवस्थेत असून, फरशी, वीजजोडणी, टाइल्स, रंगकाम, सीलिंग आदी कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत, परंतु सी आणि डी विंगमध्ये फिनिशिंगचे काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. विशेषतः डी विंगमध्ये हेलिपॅडचे बांधकाम, दोन्ही विंगमध्ये ग्लास वर्क, दारे-खिडक्या, तांत्रिक सेवा डक्ट्स या महत्त्वाच्या टप्प्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे या दोन विंग प्रत्यक्ष उपयोगासाठी तत्काळ तयार होणे शक्य नाही, असे अभियंते सांगतात.
ही कामे सुरू
लिफ्ट, एसटीपी (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट), वीजकेंद्र, तांत्रिक विभागांचे उपकरण स्थापनेचे कामही स्वतंत्र वेळ घेणारे आहे. तीन लिफ्टचे साहित्य काही महिन्यांपासून जागेवर असून, ते बसवण्यासाठी दीड महिना अपेक्षित आहे. कॅथलॅबचे स्थानांतर हा प्रकल्पातील सर्वात गुंतागुंतीचा टप्पा असल्याने त्यासाठी भिंत फोडून मार्ग तयार करणे आणि पुनर्स्थापना आवश्यक आहे. इमारतीचे काम जसजसे पूर्ण होईल तसतसे ओपीडी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करता येतील, मात्र शस्त्रक्रिया व आयसीयू विभाग सुरू होण्यासाठी अधिक काळ लागू शकतो.
कंत्राटदाराला दंड
प्रकल्पातील दिरंगाईमुळे कंत्राटदाराला यापूर्वी सुमारे तीन कोटी रुपयांचा दंड आकारला गेला आहे. तिसरी डेडलाइनही चुकल्याने अतिरिक्त दंडाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी आहे. कंत्राटाची रक्कम कायम असल्याने कोणताही अतिरिक्त खर्च न वाढता कंत्राटदारानेच काम पूर्ण करणे बंधनकारक आहे, असे जे. जे. रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
असा करणार खर्च
एकूण प्रकल्प - ७७८.६५ कोटी
स्थापत्य काम - ३६४.१० कोटी
वस्तू सेवा - ६९.४१ कोटी
विद्युत - २१३.४५ कोटी
इतर कामे - १३१.६९ कोटी
भविष्यात एअर रुग्णवाहिका
जे. जे. रुग्णालयाच्या आजूबाजूला कारागृह, नेव्ही डॉक, माझगाव शिप यार्ड हे महत्त्वाचे विभाग आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी हेलिपॅडसाठीची जागा सोडण्यात येणार आहे. कारण भविष्यात एअर रुग्णवाहिकेची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ शकते.
ए आणि बी विंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. १२ डिसेंबरपर्यंत लिफ्टचे डक्ट लावले जातील. मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करून रुग्णसेवा सुरू करण्याची आशा आहे.
- डॉ. अजय भंडारवार,
अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय