मुरबाड, ता. १३ (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या भातपिकाला प्रति क्विंटल चार हजार रुपये हमीभाव मिळावा; तसेच शासकीय भातखरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मुरबाड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. शेतीसंबंधीची कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावीत, माळशेज घाट रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवण्यात यावा, जेणेकरून वाहतूक सुरक्षित राहील आणि स्थानिक नागरिक व प्रवाशांना दिलासा मिळेल, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. या आंदोलनात विष्णू चौधरी, दत्ता पतंगराव, बाळकृष्ण हरड, लडको चौधरी यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष दिले नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.