भाषिक विविधतेच्या संरक्षणासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार
सिंधी भाषा, साहित्य व संस्कृती अभ्यासासाठी अत्याधुनिक सुविध; विवेकानंद एज्युकेशन सोसायटीसोबत सामंजस्य करार
मुंबई, ता. १५ : भारताच्या समृद्ध भाषिक विविधतेच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सिंधी भाषा, साहित्य व संस्कृती अभ्यास व संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सिंधी भाषा विभागाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या प्रस्तावित दालनात सिंधी भाषेसंदर्भात अत्याधुनिक अध्यापन व संशोधन सुविधा, सुसज्ज वर्गखोली, विशेष ग्रंथालय व अभिलेख विभाग, डिजिटल रिसोर्स लॅब्स, सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा अशी सुविधा तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, विद्यापीठ अनुदान आयोग आणि शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या भारतीय भाषा समितीच्या वतीने उच्च शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ सिंधी भाषेसाठी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या अनुषंगाने या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
२ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या सर फिरोजशहा मेहता व्यवस्थापन परिषदेच्या दालनात झालेल्या या कराराप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विवेकानंद एज्युकेशन सोसायटीतर्फे अध्यक्ष सुरेश मल्कानी, सचिव राजेशकुमार गेहानी व कोषाध्यक्ष प्रकाश लुल्ला यांच्यासह व्यवस्थापन समिती व विश्वस्त मंडळातील मान्यवर तसेच प्राचार्या डॉ. अनिता कनवर, जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेच्या डॉ. कविता लघाटे, दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिवाजी सरगर आणि सिंधी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या कराराप्रसंगी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सिंधी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा शतकानुशतकांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठात सिंधी भाषा अभ्यासासाठी विभागात दालन तयार करण्याचा निर्णय म्हणजे केवळ पायाभूत सुविधेचा विस्तार नसून भाषिक विविधतेच्या संवर्धनासाठी असलेली विद्यापीठाची कटिबद्धता असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे केंद्र परंपरा आणि नवप्रवर्तन यांचा सुंदर संगम साधत संशोधक, विद्यार्थी आणि कलाकारांना सिंधी अभ्यास समृद्ध करण्यासाठी एक ऊर्जादायी व्यासपीठ ठरेल, असे प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे यांनी सांगितले.
या कराराप्रसंगी उपस्थित सिंधी समाजातील मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभाजनानंतरच्या ऐतिहासिक आव्हानांनंतरही समाजाने जपलेल्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान या उपक्रमातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधींनीही वारसा शिक्षणावरील आपली निष्ठा व्यक्त करत भारताच्या सर्वांगीण प्रगतीत सिंधी समाजाच्या योगदानाचे विद्यापीठाने केलेले गौरवपूर्ण मूल्यांकन प्रशंसनीय असल्याचे सांगितले. सोसायटीच्या ताब्यात असलेली बहुमूल्य दुर्मिळ साहित्यसंपदा जतन, संवर्धन आणि अभ्यास व संशोधनासाठी विद्यापीठाकडे सुपूर्द केली जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
संशोधन, अध्यापन, दस्तावेजीकरण आणि सांस्कृतिक अभ्यासाच्या माध्यमातून हे केंद्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर ज्ञान-विनिमयाचे प्रभावी व्यासपीठ ठरेल.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.