मुंबईचे ‘घर’ परवडेना!
किमती गगनाला; नोकरदारांची अर्धी कमाई हप्ते फेडण्यावर होतेय खर्च
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे धनदांडग्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच स्वप्न असते. त्यासाठी कुणी आयुष्याची पुंजी लावते, तर कुणी कर्ज काढते. मात्र सध्या मुंबईतील घरांच्या किमतीचा परवडणारा दर (अफोर्डेबिलिटी इंडेक्स) ४७ टक्के एवढा म्हणजे नोकरदारांच्या मासिक कमाईची सुमारे अर्धी रक्कम घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यावर खर्च करावी लागत असल्याचे नाइट फ्रॅंक इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. देशातील इतर महानगरांचा विचार करता मुंबईत घर घेणे परवडत नसल्याने अनेकांच्या स्वप्नाला ‘घरघर’ लागत असल्याचे चित्र आहे.
देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने घरांची मागणीही त्याच प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाइट फ्रॅंक इंडिया या रियल इस्टेट क्षेत्रात काम करीत असलेल्या संस्थेने घरांच्या परवडण्याबाबत आपला अहवाल जारी केला आहे. त्यामध्ये परवडणाऱ्या घरासाठी सध्या अहमदाबादचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स देशात सर्वात चांगला असून, १८ टक्के एवढा आहे. त्याखालोखाल पुणे आणि कोलकाता २२ टक्के एवढा आहे. तर मुंबईत हा इंडेक्स ४७ टक्के एवढा असल्याने घर खरेदीदाराला आपल्या एकूण उत्पन्नाच्या सरासरी ४७ टक्के एवढी रक्कम घराच्या हप्त्यावर खर्च करावी लागत आहे. सर्वसाधारण नोकरदाराच्या मासिक उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम घराच्या हप्त्यावर खर्च होते. त्याआधारे अफोर्डेबिलिटी इंडेक्स निश्चित केला जातो, असे नाइट फ्रँक इंडियाने स्पष्ट केले आहे.
घराच्या किमती जास्त का?
मुंबईत देशातील इतर शहरांच्या तुलनेत घरांच्या किमती जास्त आहेत. त्याची वेगवेगळी करणे आहेत.
- जागांचे गणगणाला भिडलेले दर
- सरकारला प्रीमियमपोटी द्यावे लागणारे चार्जेस
- सिमेंट, स्टीलच्या किमतील वाढ
- मजुरांच्या वाढत्या किमती
- घरासाठी घेतले जाणारे जादा दराचे कर्ज
प्रत्येकाला मुंबईतच घर
हवे असल्याचा परिणाम
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने प्रत्येकाचा मुंबईकडे ओढा आहे. त्यामुळे मुंबईतच प्रत्येकाला घर हवे आहे. त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होत आहे. मुंबईबाहेर पूरक पायाभूत सुविधा वाढत जातील तसे मुंबईबाहेर घर घेण्यास पसंती मिळेल. त्यामुळे मुंबईवरील भार कमी होऊन किमती नियंत्रणात येतील, पण त्याला आणखी दीड-दोन दशकांचा काळ जाईल, असे रियल इस्टेटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
म्हाडाच्या घराला पसंती
मुंबई आणि परिसरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर आहेत. तुलनेने म्हाडाकडून लॉटरीच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या घरांच्या किमती कमी असतात. त्यामुळे सर्वसामान्यांकडून म्हाडाच्या घराला पसंती दिली जात आहे. वर्षभरापूर्वी म्हाडाने मुंबईतील २०२० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली होती. त्याला तब्बल एक लाख १५ हजार अर्ज आले होते. तर दोन महिन्यांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजार घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या जाहिरातीला एक लाख ५८ हजार ऑनलाइन अर्ज आले होते. यावरून मुंबईकरांची परवडणारे घर खरेदी करण्यासाठीची इच्छा दिसून येत आहे.
अफोर्डेबिलिटी इंडेक्स
- मुंबई - ४७ टक्के
- एनसीआर दिल्ली - २८ टक्के
- बंगळुरू - २७ टक्के
- पुणे - २२ टक्के
- चेन्नई - २३ टक्के
- हैदराबाद - ३० टक्के
- कोलकाता - २२ टक्के
- अहमदाबाद - १८ टक्के
( घर खरेदीदाराची मासिक उत्पन्नापैकी किती टक्के रक्कम ईएमआयवर खर्च होते, त्यावर आधारित अफोर्डेबिलिटी इंडेक्स आहे.)
मुंबईतील जागांच्या किमती, सरकारला द्यावे लागणारे शुल्क यामुळे येथील घरांच्या किंमती जास्त असल्याचे दिसते. मुंबईवगळता इतरत्र घर बांधणीवर सरकारकडून लावले जाणारे शुल्क अत्यंत कमी आहेत. त्यामुळे मुंबईतील घरांच्या किंमतीची इतर शहरातील घरांच्या किमतीशी तुलना होऊ शकत नाही.
- केवल वालंबिया,
सीओओ, क्रेडाई-एमसीएचआय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.