मायक्रोसर्जरीमुळे ३० वर्षीय रुग्णाला जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : औद्योगिक अपघातात डाव्या पायाला व घोट्याला गंभीर इजा झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आहेत. वेळेवर हस्तक्षेप आणि अत्याधुनिक मायक्रोसर्जरीनंतर अवघ्या सहा आठवड्यांत संबंधित तरुण कोणत्याही आधाराशिवाय चालू लागला आहे. कामाच्या ठिकाणी दगड फोडण्याच्या मशीनमध्ये पाय अडकल्याने हा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचारांसाठी सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तपासणीत पायातील सॉफ्ट टिश्यू व हाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. संसर्ग टाळण्यासाठी बोटांचे विच्छेदन करावे लागले, तसेच पायाच्या आतील भागाचा दोन-तृतीयांश हिस्सा काढून टाकण्यात आला. यानंतर निरुपयोगी टिश्यू व हाडे काढून टाकण्यात आली. टाचेकडील हाडाच्या फ्रॅक्चरवर के-वायर लावून ते स्थिर करण्यात आले. जखम भरून येण्यासाठी आणि पुढील पुनर्रचनेसाठी तयारी म्हणून व्हॅक (व्हॅक्यूम-असिस्टेड क्लोजर) ड्रेसिंग करण्यात आले.
.........
रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर अत्यंत गुंतागुंतीची मायक्रोसर्जिकल पुनर्रचना शस्त्रक्रिया करण्यात आली. शरीराच्या दुसऱ्या भागातून आवश्यक त्या आकाराचा मास भाग आणि त्यासोबतच्या रक्तवाहिन्या काढून त्या पायातील रक्तवाहिन्यांशी जोडण्यात आल्या. यामुळे, पायाला पुरेसा रक्तपुरवठा सुरू राहिला आणि जखम भरून आली.
.............................................
अपघाताचा आघात गंभीर असल्याने रुग्णाच्या पायाचा ८० टक्क्यांहून अधिक भाग खराब झाला होता. अशा तीव्र इजांमध्ये केवळ अवयव वाचवणे नव्हे, तर त्याची कार्यक्षमता पुन्हा पूर्ववत करणे हे मोठे आव्हान असते. टप्प्याटप्प्याने करण्यात आलेली जखमेची स्वच्छता थेरपीद्वारे जखम भरून येण्यासाठी आवश्यक तयारी आणि अत्यंत अचूक मायक्रोसर्जिकल पुनर्बांधणीमुळे या रुग्णाला चांगला व कार्यक्षम उपचार मिळाले.
- डॉ. मुर्तुजा रंगवाला, रिकन्स्ट्रक्शन व प्लास्टिक सर्जन