विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब!
नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ
मुंबई, ता. ३० : नवी मुंबई विमानतळावर नुकतीच प्रवासी सेवा सुरू झाली, मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विमानतळ प्रशासनाने वाय-फाय सुविधा उपलब्ध केली असली तरी विमानतळावर दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांना अव्वाच्या सव्वा दर आकारले आहेत. तोपर्यंत त्यांना परिसरात परवानगीही नाकारली आहे. याविरोधात दूरसंचार कंपन्यांच्या संघटनेने दूरसंचार मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.
नवी मुंबई विमानतळ सार्वजनिक ठिकाण असल्याने या ठिकाणी दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्यास परवानगी देणे दूरसंचार कायद्यान्वये बंधनकारक आहे. या ठिकाणी रिलायन्स इन्फोकॉम, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्या सेवा पुरवण्यास इच्छुक आहेत. त्यासंदर्भात त्यांनी विमानतळ प्रशासनाकडे दूरसंचार जाळे उभारण्याची परवानगी मागितल्यावर ती नाकारण्यात आल्याचा दावा सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे. कंपन्यांनी दूरसंचार जाळे उभारण्याऐवजी विमानतळ प्रशासनाने आपले स्वतःचे जाळे वापरण्याची अट या कंपन्यांवर लादली; मात्र त्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे म्हणजेच प्रत्येक कंपनीकडून दरमहा ९२ लाख रुपये भाडे सांगितले आहे. हे शुल्क अवाजवी असून, तेथे दूरसंचार जाळे उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या आणि नियमात नमूद असलेल्या शुल्कापेक्षा अधिक असल्याचा असोसिएशनचा दावा आहे.
----
ही तर मक्तेदारी!
दूरसंचार सेवा पुरवण्याचा हक्क केवळ स्वतःलाच असल्याचे नवी मुंबई विमानतळाने घोषित केले आहे; मात्र ही बाब दूरसंचार नियामक चौकटीच्या विरोधात आहे. कायद्यानुसार दूरसंचार सेवा पुरवण्याची मक्तेदारी कोणालाही मिळू शकत नाही. तसे केल्यास स्पर्धा नष्ट होऊन ग्राहकांना सेवानिवडीचे स्वातंत्र्य मिळणार नाही, असे असोसिएशन नमूद केले आहे.
---
सेवाशुल्क अवाजवी नाही!
विमानतळ हे संवेदनशील क्षेत्र असल्याने दूरसंचार सेवेची देखभाल अत्यावश्यक आहे. हे काम विमानतळातर्फेच सर्वोत्तम होऊ शकते. दूरसंचार कंपन्यांना आमचे सेवाजाळे पुरवण्यासाठी आकारलेले शुल्क हे उद्योग क्षेत्रांच्या मानकांनुसारच आहे; मात्र त्यास दूरसंचार कंपन्यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही, असे स्पष्टीकरण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने दिले आहे. यासंदर्भात कंपन्यांशी चर्चा करूनच विमानतळावर आयबीएस सेवा उभारली आहे. बीएसएनएलही लवकरच आमच्या सेवेची चाचणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.