बिबट्याच्या हालचालींवर ‘जीपीएस’द्वारे देखरेख
सॅटेलाइट कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात रवानगी; वन विभागाचा यशस्वी प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : भाईंदर पूर्व येथील पारिजात सोसायटी या निवासी संकुलात शिरलेल्या बिबट्याला महाराष्ट्र वन विभागाने सुरक्षितपणे जेरबंद केल्यानंतर, आता त्याला सॅटेलाइट कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले आहे. या आधुनिक प्रयोगामुळे बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे अधिक सुलभ होणार आहे.
भाईंदरमधील निवासी वस्तीत हा बिबट्या १९ डिसेंबरला शिरला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वन विभागाच्या बचाव पथकाने अत्यंत कौशल्याने त्याला पकडले. त्यानंतर त्याची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये तो पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळले. त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी २० डिसेंबरला घटनास्थळाची पाहणी केली, तसेच जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. त्यांच्याच सूचनेनुसार, या बिबट्याला केवळ जंगलात न सोडता, त्याच्यावर सॅटेलाइट कॉलर लावून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य वन्यजीव रक्षक यांनी गठित केलेल्या समितीसमोर या प्रक्रियेचे सादरीकरण झाल्यानंतर, २५ डिसेंबरला बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या बिबट्याला बसवलेली मायक्रोचिप आणि सॅटेलाइट कॉलर (जीपीएस)मुळे वन विभागाला त्याचे अचूक लोकेशन समजणार आहे. वन कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेचे संशोधन पथक रेडिओ सिग्नलच्या साहाय्याने त्याचा मागोवा घेत आहेत. २५ डिसेंबरपासून हा बिबट्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात स्थिरावला असून तो मानवी वस्तीकडे येत नसल्याचे दिसून आले आहे. ही संपूर्ण कारवाई वनसंरक्षक अनिता पाटील आणि ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
राज्यात बिबट्यांशी संबंधित संघर्ष वाढत आहे. हा बिबट्या वयाने लहान असून वाट चुकल्यामुळे तो शहरात आला असावा. त्याच्या हालचाली समजून घेण्यासाठी आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी त्याला रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आले आहे. आमची पथके त्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत.
- गणेश नाईक, वनमंत्री
वन विभाग सार्वजनिक सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. जीपीएस कॉलरमुळे बिबट्याच्या सुटकेनंतर त्याच्या व्यवस्थापनाचे निर्णय घेणे सोपे होते. अशा उपाययोजनांमुळे मानव आणि वन्यजीवांमध्ये सहअस्तित्व साधण्यास मदत होते.
- अनिता पाटील, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.