मुंबईचा कौल : नऊ वर्षांनंतर ‘मराठी टक्का’ रस्त्यावर
दादर, लालबागसह गिरगावात मतदानाचा उत्साह!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज मुंबई महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. या निवडणुकीत मुंबईतील ‘मराठमोळ्या’ पट्ट्याने आपला पारंपरिक उत्साह कायम राखत सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले. विशेषतः मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये मतदानाच्या टक्केवारीने दुपारनंतर मोठी झेप घेतली.
मराठी संस्कृतीचा केंद्रबिंदू असलेल्या दादर (शिवाजी पार्क), माहीम आणि गिरगाव भागात सकाळी ७ वाजल्यापासूनच ज्येष्ठ नागरिक आणि नवमतदारांनी गर्दी केली होती. लालबाग-परळ या गिरगावच्या पट्ट्यात कामगार आणि मध्यमवर्गीयांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला हक्क बजावला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ‘जी-उत्तर’ (दादर-माहीम) आणि ‘एफ-दक्षिण’ (लालबाग-शिवडी) येथे मतदानाची टक्केवारी तुलनेत सातत्याने अधिक दिसून आली. मराठीबहुल परिसर पारंपरिकपणे शिवसेना (ठाकरे गट) यांचा बालेकिल्ला मानला जातो; मात्र बदललेल्या राजकीय समीकरणानंतर या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबईत सकाळी ९:३० वाजेपर्यंत एकूण ६.९८ टक्के मतदानाची नोंद झाली असली, तरी मराठीबहुल भागात हे चित्र वेगळे होते. ‘जी-उत्तर’ प्रभागात सुरुवातीच्या अडीच तासांतच मतदारांनी वेग घेतला. सकाळी ११:३० वाजेपर्यंत मुंबईचा सरासरी टक्का १७.७३ वर पोहोचला, तर दादर-माहीम पट्ट्यात २४ टक्के आणि परळ-लालबाग भागात ३४ टक्के इतके भरघोस मतदान झाले होते. दुपारी १:३०च्या सुमारास मुंबईची सरासरी २९.९६ टक्क्यांवर गेली. दुपारी ३:३० वाजेपर्यंत मुंबईने ४१.८ टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता. यामध्ये भांडुप-कांजूरमार्ग विभागाने ५० टक्क्यांसह आघाडी घेतली, तर दादर-परळमध्ये ४३ टक्के आणि मुलुंडमध्ये ४२ टक्के मतदान झाले. विलेपार्ले पूर्व आणि अंधेरी पूर्व भागातही ४० टक्के मतदानाची नोंद झाली.
......
प्रतिक्रिया :
प्रभागाचा विकास हा महत्त्वाचा आहे. विकास कोणी केलाय आणि कोण करणार, हे बघूनच आम्ही मतदान केलेले आहे. आमचे मतदान फक्त विकासाला आहे.
- किरण आणवेकर, मतदार
......
दादर-लालबाग-परळ म्हणजे मराठी अस्मितेचा बालेकिल्ला. आमचा परिसर बदलायला लागलाय, पण आमची मतदानाची परंपरा तशीच आहे. तरुणांनी केवळ सुट्टी म्हणून न पाहता मोठ्या संख्येने रांगा लावल्या आहेत, हीच आमची ताकद आहे.
- सुनील कडवे, मतदार
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.