मतदार जनजागृतीसाठी सवलत
हॉटेल ग्राहकांमध्ये २० टक्के वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आहार संघटनेने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मतदारांना सवलत जाहीर केली होती. त्याला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दररोजच्या तुलनेत २० टक्के ग्राहक वाढले, अशी माहिती आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिली.
‘मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग उपक्रम राबविला. या मोहिमेत महाराष्ट्रातील इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने पुढाकार घेतला. १५ जानेवारीला मतदान केलेल्या मतदारांना आहारशी संलग्न रेस्टॉरंट्स, हॉटेल्समध्ये विशिष्ट सवलत मिळाली.
मुंबई महापालिका निवडणुकीचे ओएसडी (स्वीप) भरत मराठे म्हणाले, मी आज दुपारी सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर, फोर्ट येथील आराम रेस्टॉरंटला भेट दिली. ‘आहार’ संस्थेशी संलग्न रेस्टॉरंट्स मतदानाची शाई लावलेले बोट दाखवल्यावर जेवणावर सवलत देत आहेत का, याची खात्री केली. या उपक्रमांबद्दल संबंधितांचे त्यांनी आभार मानले.