मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
२,२९९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; आयुक्तांकडून आढावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (ता. १६) रोजी सकाळी १० वाजल्यापासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करून मतमोजणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा-सुव्यवस्थेबाबत नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी दोन हजार २९९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तयारीचा आढावा घेतला.
महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ प्रभागांसाठी २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत अभिरक्षा कक्ष, मतमोजणीची ठिकाणे निश्चित केली आहेत. आयुक्त भूषण गगराणी यांनी आज मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले.
----
तैनात मनुष्यबळ
७५९
पर्यवेक्षक
--
७७०
सहाय्यक
---
७७०
चतुर्थश्रेणी कर्मचारी
----