मतदान केल्यास स्केचसाठी २५ टक्के सवलत
मुंबई, ता. १५ : महापालिका निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी विविध संस्था आणि संघटना पुढाकार घेत आहेत. या प्रयत्नांना पाठिंबाही मिळत आहे. डहाणू येथील स्केच आर्टिस्ट जयेश दळवी यांनी मतदारांना २५ टक्के सवलत जाहीर केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दळवी हे दर रविवारी शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावर स्केच काढून देतात. १५ जानेवारी रोजी मतदान सुट्टी असल्याने दळवी यांनी सर्व मतदारांना २५ टक्के सवलत दिली होती. या सवलतीमुळे स्टॉलवर ग्राहकांची गर्दी झाली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. ‘‘महापालिका निवडणुकीत मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी मी हा छोटासा पुढाकार घेतला,’’ असे दळवी यांनी सांगितले. या सवलतीमुळे अनेक कुटुंबांनी फायदा घेतला. एका ग्राहकाने सांगितले, ‘‘सवलत मिळाली आणि मतदानाचे महत्त्वही समजले.’’ निवडणूक आयोगाच्या मतदार जागृती मोहिमेत असे कलाकार सहभागी होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. या उपक्रमामुळे मतदानात नक्की भर पडेल.