तीन दिवसांपूर्वी मतदान केंद्रे बदलली
काँग्रेस उमेदवारचा आरोप
मुंबई, ता. १५ : गोरेगाव परिसरात आजचे मतदान शांततेत झाले; मात्र तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने अनेक वसाहतींमधील मतदान केंद्रे बदलल्याने संभ्रम निर्माण झाल्याचा तसेच मतदार यादीमध्ये अनेकांची नावे नसल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार गौरव राणे यांनी केला.
गोरेगावातील अनेक प्रभागांत ज्येष्ठ नागरिक, अपंग आदींसाठी व्हीलचेअर, वैद्यकीय कक्ष अशा सुविधा सज्ज होत्या. पोलिसही तेथे आलेल्या मतदारांना सर्व साह्य करीत होते. तसेच ज्या मतदारांचे नाव तेथे नाही त्यांना इतरत्र नेऊनही सहाय्य करीत होते. दरम्यान, मतदान यादीतून नाव गायब होण्याच्या अनेक तक्रारी आल्या.
अनेक वसाहतींतील नागरिकांचे गेली किमान वीस वर्षे मतदार केंद्र विशिष्ट शाळेतच येत होते. ते या वेळी बदलल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हा प्रकार तीन दिवस आधी प्रशासनाने केल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचीही धावपळ झाली, असा आरोप काँग्रेस उमेदवार गौरव राणे यांनी केला. तर प्रशासनाने मतदार यादीमध्येही मुद्दाम गोंधळ केल्यामुळे अनेकांना मतदान करता आले नाही, असेही ते म्हणाले. भारती कंकारिया यांच्या पतीचे नाव मतदार यादीत होते; मात्र त्यांचे नाव यादीत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या सह्याने परिसरातील अनेक मतदान केंद्रांमध्ये आपले नाव आहे का ते शोधले. गोरेगावच्या निवडणूक कार्यालयातही त्यांनी तपास केला; मात्र तुमची यादी अपडेट झाली नसल्याचे त्यांना उत्तर मिळाले.