‘मराठी कार्ड’ला मुंबईकरांची पसंती!
भाजप-ठाकरे गटात अवघ्या एका जागेचा फरक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने ‘मराठी अस्मिते’च्या मुद्द्याभोवती फिरली. निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिकेत एकूण १५१ मराठी नगरसेवक मुंबईकरांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुंबईच्या राजकारणात मराठी टक्का टिकवून ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी खेळलेली ‘मराठी कार्ड’ची रणनीती यशस्वी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
निवडणुकीपूर्वी मुंबईचे ‘अदाणीकरण’ आणि ‘मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय’ असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळातून झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही प्रमुख पक्षांनी मराठी उमेदवारांवर भर दिला. निवडणुकीनंतर २२७ पैकी एकूण १५१ मराठी नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मराठी नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. ठाकरे गटाने सर्वाधिक १५२ जागा लढवल्या. त्यापैकी ५७ मराठी नगरसेवक निवडून आले. भाजपनेही ठाकरेंना तोडीस तोड टक्कर दिली. १३९ जागा लढवून भाजपचे ५६ मराठी नगरसेवक विजयी झाले आहेत. या दोन्ही पक्षांच्या मराठी नगरसेवकांच्या संख्येत केवळ एकचा फरक आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने ९० जागा लढवत २५ मराठी नगरसेवक निवडून आणले. मनसेचे पाच आणि शरद पवार गटाचा एक मराठी नगरसेवक निवडून आला. येत्या काळात हे सर्व मराठी शिलेदार मुंबईच्या हितासाठी एकवटणार की राजकीय मतभेदातून एकमेकांचे वाभाडे काढणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
.....
पक्षनिहाय मराठी नगरसेवकांची संख्या
पक्ष लढवलेल्या जागा मराठी नगरसेवक
शिवसेना ठाकरे १६३ ५७
भाजप १३९ ५६
शिवसेना शिंदे ९० २५
काँग्रेस १५२ ६
मनसे ५१ ५
राष्ट्रवादी शरद पवार ११ १
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.