मुंबई महापालिकेत ‘घराणेशाही’चा बोलबाला!
५० पेक्षा अधिक नातेवाईक ‘हाउस’मध्ये; अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले ढासळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी एकीकडे राजकीय समीकरणे बदलली, तर दुसरीकडे राजकीय वारसा जपणाऱ्या उमेदवारांचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वेळेस मुंबई महापालिकेत सुमारे ५० होऊन अधिक माजी नगरसेवकांचे नातेवाईक, ज्यात पत्नी, मुले किंवा जवळचे नातेवाईक यांचा समावेश आहे. ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्यात अनेक जण यशस्वी झाले असले, तरी काही दिग्गजांना मात्र आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
मुंबईच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राजकीय कुटुंबांच्या हातात गेल्या आहेत. असे असले तरी काही दिग्गज्जांना धक्कादेखील बसला आहे. अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना रिंगणात उतरवले होते. मतदारांनी यातील काहींना नाकारल्याने त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले. पक्षनिहाय चित्र पाहिले तर ठाकरे गट आणि भाजपने सर्वाधिक नातेवाइकांना संधी दिली आणि ते निवडूनही आले.
पक्षनिहाय निवडून आलेले वारसदार उमेदवार :
शिवसेना (ठाकरे) - एकूण १५ :
अंकित सुनील प्रभू, झीशान चंगेश मुलतानी, सबा हारून खान, गीतेश राऊत, शिवानी शैलेश परब, पूजा विश्वनाथ महाडेश्वर, श्रावरी सदा परब, सुनील सयाजी मोरे, स्वरूपा तुकाराम पाटील, मीनाक्षी अनिल पाटणकर, अनिल लक्ष्मण कदम, निशिकांत गोविंद शिंदे, पद्मजा आशीष चेंबूरकर, योगिता प्रशांत कदम, राजुल पाटील.
भाजप - एकूण १३ :
दक्षता श्रीकांत कवठणकर, मनीषा कमलेश यादव, तेजिंदर सतनाम तिवाना, ममता पंकज यादव, दिशा सुनील यादव, जगदीश्वरी जगदीश अमीन, अंजली अभिजित सामंत, अनिता नंदकुमार वैती, दिनेश बबलू पांचाळ, कशिश राजेश फुलवारिया, रोहिदास लोखंडे, गौरवी शिवलकर-नार्वेकर, अजय किसन पाटील.
शिवसेना (शिंदे गट) - एकूण १० :
दीक्षा हर्षद कारकर, डॉ. अदिती भास्कर खुरसंगे, वर्षा स्वप्नील टेंबवलकर, रितेश कमलेश राय, शैला दिलीप लांडे, मीनल संजय तुर्डे, मानसी मंगेश सातमकर, वनिता दत्ताराम नरवणकर, यामिनी यशवंत जाधव, सुरेश आवळे.
काँग्रेस -एकूण ७ :
अजंता यादव, राजा रेहबर सिराज, हैदर अली शेख, डॉ. समन अर्शद आझमी, आयेशा सुफियान वानू, साजिदाबी बब्बू खान, आशा दीपक काळे, नसीमा जावेद जुनेजा.
इतर पक्ष - एकूण ३ :
मनसे : साई सनी शिर्के (१)
एनसीपी अजित पवार गट : बुशरा नदीम मलिक (१)
समाजवादी पक्ष : आमरीन शहजाद अब्राहणी (१)
दिग्गजांना घरचा रस्ता :
महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रमात अनेक दिग्गजांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असून, यात प्रामुख्याने शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांना माहीम-प्रभादेवी पट्ट्यात पराभवाचा मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर यांनाही जोगेश्वरी भागात विजय मिळवता आला नाही. याव्यतिरिक्त कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी यांना त्यांच्या भायखळ्यातील बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला, तसेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते रवि राजा यांसारख्या मोठ्या नावांनाही मतदारांनी नाकारले आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नातेवाईक वैशाली शेवाळे आणि राष्ट्रवादीचे कॅप्टन मलिक यांनाही पराभवाचा फटका बसल्याने या निवडणुकीत केवळ राजकीय वारसा असून चालत नाही तर प्रत्यक्ष जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा महत्त्वाची ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत बोलताना सांगितले, की स्थानिक राजकारणात नावाचे वलय आणि कौटुंबिक वारसा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागावर असलेली पकड कायम राखण्यासाठी घरातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. मात्र हे निकाल पाहता असे लक्षात येते, की केवळ नाव असून चालत नाही तर त्या प्रभागातील कामाचा आवाकाही महत्त्वाचा ठरला आहे. जिथे वारसा आणि कार्य यांचा मेळ बसला तिथे जनतेने भरभरून मते दिली आहेत. आता या नव्या ५० वारसदार नगरसेवकांमुळे मुंबई महापालिकेचा कारभार कशा प्रकारे बदलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.