तुंबलेल्या पाण्याला झटपट उतारा!
मार्चअखेर चार पूर निवारण वाहने सेवेत
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती आणि सखल भागांत साचणारे पाणी यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महापालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने आपल्या ताफ्यात अत्याधुनिक पूर निवारण वाहन समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात अशी चार वाहने खरेदी करण्यात आली आहेत. मार्चअखेरपर्यंत ही वाहने पालिकेच्या सेवेत दाखल होणार आहेत.
तुंबलेल्या पाण्यावर रामबाण उपाय
दरवर्षी मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्याने हिंदमाता, किंग सर्कल, मिलन सबवे तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या भागांत पाणी साचून मुंबईची लाइफलाइन ठप्प होते. साचलेल्या पाण्यामुळे वाहने बंद पडतात आणि संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी होते. या समस्येवर तोडगा म्हणून ही नवीन वाहने तैनात केली जातील. ज्या ठिकाणी पाणी तुंबेल, तिथे ही वाहने तत्काळ पोहोचून शीघ्रगतीने पाण्याचा उपसा करतील, ज्यामुळे रस्ते लवकर मोकळे होण्यास मदत होईल, असे पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इलेक्ट्रिक पॉवर आणि बहुउद्देशीय वापर
वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ही सर्व वाहने इलेक्ट्रिक असून, त्यांना पेट्रोल, डिझेल किंवा बाह्य विद्युतपुरवठ्याची गरज भासणार नाही. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी या वाहनांचा वापर नालेसफाईसाठी केला जाणार आहे. यामुळे पालिकेच्या नाले स्वच्छता मोहिमेलाही गती मिळणार आहे.
पाणी उपसा क्षमता
मुंबई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या अत्याधुनिक वाहनांची पाणी उपसण्याची क्षमता प्रचंड असून, ते एका तासात तब्बल २५० क्युबिक मीटर पाणी उपसू शकते. पावसाळ्यात हिंदमाता, मिलन सबवे आणि पूर्व-पश्चिम मुक्त मार्गांसारख्या संवेदनशील भागात ही वाहने तैनात केली जाणार आहेत. या वाहनांवरील दुहेरी पंप प्रणालीमुळे तातडीच्या वेळी दोन हाय-पॉवर पंप एकाच वेळी चालवून साचलेल्या पाण्याचा जलद निचरा करणे शक्य होणार आहे.
अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण
या वाहनांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वॉटर रिसायकलिंगची यंत्रणा आहे. उपसा केलेले १०, ००० लिटर पाण्यापैकी ६,००० लिटर अशुद्ध पाणी रिसायकल करून त्यातून ३,००० लिटर शुद्ध पाणी तयार करण्याची क्षमता यात आहे. हे पाणी इतर कामांसाठी वापरता येणार असून, त्यासाठी वाहनावर १०,००० लिटरची टाकी बसवण्यात आली आहे.
स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन
हे पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन असल्याने शून्य प्रदूषण आणि स्वयंचलित कार्यप्रणालीवर आधारित आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, ही अद्ययावत यंत्रणा हाताळण्यासाठी केवळ एक ड्रायव्हर आणि दोन कामगार अशा एकूण तीन जणांच्या मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
देखभाल-दुरुस्तीसाठी संस्था
साधारण अडीच ते तीन कोटी रुपये किंमत असलेल्या या वाहनांच्या खरेदीवर सुमारे १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या वाहनांच्या परिचलन, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पुढील आठ वर्षांसाठी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे. आरटीओकडे या वाहनांची नोंदणीदेखील करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही वाहने पालिकेच्या ताब्यात येणार असल्याने, यंदा मुंबईकरांची साचलेल्या पाण्यातून आणि वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होण्याची शक्यता आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
* प्रचंड उपसा क्षमता : एका तासाला तब्बल २५० क्युबिक मीटर पाणी उपसण्याची क्षमता.
* हॉटस्पॉट्सवर तैनात : हिंदमाता, सबवे आणि हायवे यांसारख्या संवेदनशील ठिकाणी ही वाहने तातडीने प्रतिसाद देतील.
दुहेरी पंप यंत्रणा ः तातडीच्या वेळी दोन हाय-पॉवर पंप एकाच वेळी चालवून पाण्याचा निचरा करता येणार.
* स्वयंचलित आणि पर्यावरणपूरक : पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन असल्याने शून्य प्रदूषण आणि स्वयंचलित कार्यप्रणाली.
* कमी मनुष्यबळ : ही अत्याधुनिक यंत्रणा हाताळण्यासाठी केवळ तीन जणांची (एक ड्रायव्हर आणि दोन कामगार) आवश्यकता.
* देखभाल आणि खर्च : एका वाहनाची किंमत साधारण ३.५ कोटी रुपये असून, कंत्राटदाराकडे पुढील आठ वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.