नवजात अर्भकाला जीवदान
पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कांदिवलीतील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी नवजात अर्भकाला जीवदान दिले आहे. गेल्या महिन्यात एका महिलेने मुलीला जन्म दिला. जन्मानंतर काही तासांतच या नवजात अर्भकाचे शरीर निळे पडू लागले व बाळाचा श्वासोच्छ्वास अनियमित झाला. या बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तातडीने अतिदक्षता कक्षात दाखल केले. त्यानंतर, रुग्णालयातील डॉक्टरांनी आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले. या उपचारांना नवजात बाळाने चांगला प्रतिसाद दिला. आता महिन्याभराने बाळ आणि बाळंतिणीची तब्येत उत्तम आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले की, एका स्त्रीने गेल्या महिन्यात एका मुलीला जन्म दिला. वेळेत व सर्वसामान्य (फुल टर्म प्रेग्नन्सी व नॉर्मल डिलिव्हरी) जन्म झालेल्या या नवजात स्त्री अर्भकाचे जन्मतः वजन ३ किलो होते. बाळाच्या जन्मानंतर बालरोगतज्ज्ञांना नवजात बाळाचे शरीर निळे पडले असल्याचे व तिचा श्वासोच्छ्वास अनियमित झाल्याचे दिसून आले. अर्भकाला तात्काळ अतिदक्षता विभागात स्थलांतरित करून ‘बबल सीपॅप’ सुरू केले. त्यानंतरही नवजात बाळाचा श्वासोच्छ्वास नियंत्रित होत नव्हता. त्यामुळे, तिला इनट्युवेटेड व व्हेन्टिलेटेड करण्यात आले. निष्णात बालरोग व हृदयरोगतज्ज्ञ यांचेदेखील मार्गदर्शन घेण्यात आले. नवजात बाळाचा कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू झाल्यानंतर डॉ. आंबेडकर रुग्णालयातील डी.एन.बी. शिक्षक व निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुकुंद शिरोळकर यांनी बेडसाईड इको चाचणी केली. या चाचणीनुसार त्यांनी बाळाला ट्रान्सिएन्ट पल्मोनरी हायपरटेन्शनची शक्यता वर्तवल्यामुळे ‘स्लाईडेनाफिल’ सुरू करण्यात आले. बाळाच्या सतत निरीक्षणादरम्यान २% पेक्षा जास्त प्रमाण अनियमित मानले जाणाऱ्या मेथॅमोग्लोबिनची पातळी ३०% दरम्यान आढळल्यानंतर तातडीने बाळाची एचबी इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली. या चाचणीमध्ये हिमोग्लोबिन एम मध्ये अनियमितता आढळली नाही. परंतु, एन्झायम्स ॲनालायसिसमध्ये या बाळात एनएडीएच सायक्लोटोम बी फाइव्ह रिडक्टेस डेफिशिएन्सी असल्याचे आढळले. वैद्यकीयदृष्ट्या ही बाब अत्यंत दुर्मिळ असल्याने बाळाची आई व वडील या दोघांचीही ही चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आले.
डॉ. आंबेडकर रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या नवजात बाळाला इंजेक्शन मेथिनिल ब्ल्यूचे उपचार सुरू केले. ज्यामुळे, तिची मेथमोग्लोबिनची पातळी २% पेक्षा कमी झाली. त्यानंतर, बाळाचे एक्सट्युबेशन केले असता, रूम एअरवर ९८% सॅच्युरेशनसह तिने नियमित श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. यासह व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ई ची पूरक मात्रा बाळाला सुरू करण्यात आली आणि बाळाच्या प्रकृतीत सुधारणा आढळली. काही चाचण्या केल्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागातून डिस्चार्ज देण्यात आला. आता साधारणपणे महिन्याभरानंतर बाळाची प्रकृती उत्तम आहे.
– डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.