मनोज कळमकर ः सकाळ वृत्तसेवा
खालापूर, ता. २ : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असतानाही पटसंख्येअभावी त्या ओस पडत आहेत. या शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना दाखल करावे, यासाठी खालापूर तालुक्यातील नावंढे ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठराव घेतला आहे. जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करतील, त्यांची घरपट्टी माफ केली जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील जे कुटुंब किमान पाच रोपांची लागवड करून संगोपन करतील, त्या कुटुंबातील महिलेस एक पैठणी तर पुरुषास एक पोशाख देण्यात येईल, असा ठराव ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर केला आहे.
अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी नावंढे जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५२८ शाळांपैकी २६ शाळा पटसंख्याअभावी बंद झाल्या आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या शाळांची संख्या कमी होऊन दोन हजार ५०२ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाच वर्षांत १००हून अधिक शाळा बंद झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती, शिक्षकांवर शाळाबाह्य कामे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजगारासाठी होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे प्राथमिक शाळांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पालकांमध्येही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांविषयी दुजाभाव निर्माण झाला आहे. अनेक शाळांमध्ये राजकारण केले जात असल्याने शिक्षणापेक्षा इतर कामांना महत्त्व दिले जात आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुणवत्तेपेक्षा जाहिरातबाजी, झगमगाट असल्याने त्याला भुलणारे पालक पाहायला मिळत आहेत. इतरांची मुले त्या शाळेत जातात तर आपली का नकोत, या भूमिकेतून पालक सरकारी प्राथमिक शाळांकडे पाठ फिरवत आहेत.
खालापूर तालुक्यातील नावंढे गावातही इंग्रजी शाळांचे जाळे विणले जात आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी होत असल्याने जिल्हा परिषदेची शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनीही कौतुक करीत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे, असे आवाहन केले आहे.
वृक्षसंवर्धनासाठी विशेष मोहीम
गावामध्ये सिमेंट काँक्रीटच्या इमारती, रस्ते झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी ज्या घरात पंखा लावण्याची गरज नव्हती त्या घरामध्ये पंखे, एसी लावणे गरजेचे झाले आहे. यावर उपाय म्हणून गावात आणि मोकळ्या जागेवर झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. यासाठी त्या झाडाला जिओ टॅगिंग करून दोन वर्षांनंतर त्या कुटुंबाचा पैठणी तसेच पोषाख देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
पटसंख्या वाढीसाठी अनेक उपाय
मोफत शिक्षण, पुस्तके, गणवेश, मध्यान्ह भोजन यांसारख्या सोयीसुविधा देऊनही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यात शिक्षण विभागाला अपयश येत आहे. खासगी शाळांचे वाढते प्रस्थ, रोजगारासाठी स्थलांतर हे यामागील प्रमुख कारण आहे. हे कारण आहेच; परंतु रोजगारासाठी होणारे स्थलांतर प्राथमिक शाळांच्या मुळावर आले आहे. काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकून उच्च पदांवर पोहोचलेले पालकदेखील आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवायला तयार नाहीत, असेच दिसून येत आहे. यास नावंढे ग्रामपंचायतीने प्रतिआव्हान दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या कमी होत आहे. यावर उपाय म्हणून गावातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश दिल्यानंतर घरपट्टी माफीचा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर विकासकामांमुळे होत असलेली वृक्षतोड याची कुठेतरी भरपाई व्हावी यासाठी नावंढे ग्रामस्थांनी स्तुत्य पाऊल उचलले आहे. यातून गावातील पर्यावरण संगोपनास मदत होईल.
- किरण हाडप, माजी ग्रामपंचायत सदस्य , नावंढे
नावंढे ग्रामपंचायतीने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो; तरीही शाळा ओस पडत असल्याचे पाहावयास मिळते. राज्यात इतरही जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये असा उपक्रम राबवण्यात आला आहे. असा उपक्रम इतरही ग्रामपंचायतींमध्ये राबवता येतो का, हे तपासत आहोत. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन घेऊन ग्रामपंचायत स्तरावर काय करता येईल याचा विचार केला जात आहे.
- राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)
जिल्हा परिषदेच्या शाळांवर दृष्टिक्षेप
शाळा - २,५२८
विद्यार्थी - १९८ हजार
शिक्षक - ९ हजार
विद्यार्थी शिक्षक प्रमाण - २२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.