उरण, ता. २६ (वार्ताहर) : उरणच्या ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे; तर काही प्रकल्पातून आणि सिडको हद्दीतील रहिवासी संकुलातील कचरा रस्त्यावर टाकून डम्पिंग ग्राउंड केल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
उरण तालुक्यात कचऱ्याची समस्या मोठी जटिल बनली आहे. कचरा प्रकल्प नसल्याने तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींबरोबरच इतर प्रकल्प आणि सिडको हद्दीतील रहिवासी संकुलातील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला गेला असून नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. चिरनेर- खोपटा मार्गावर, चिर्ले- दिघोडे, पीरवाडी- चारफाटा रस्त्यासह तालुक्यातील इतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. सिडकोने गोळा करून आणलेला कचरा द्रोणागिरी नोडच्या रहदारीच्या रस्त्यावरच टाकला जातो. पावसाळ्यात कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
--------------
ग्रामपंचायतीसह इतर प्रकल्पांचा कचरा रस्त्यावर टाकला जातो. द्रोणागिरी नोडमधील रस्त्यावरही कचरा आणून टाकला जात आहे. कचरा जास्त दिवस राहिल्याने त्यामधून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. सरकारने कचरा प्रकल्प निर्माण केल्यास ही समस्या मार्गी लागेल.
- सन्नी पाटील, रहिवासी, द्रोणागिरी नोड
-----------------
सिडकोकडे बोकडवीरा हद्दीमध्ये जागा आहे. आम्ही पंचायत समिती स्तरावर त्यांच्याकडून प्रकल्पासाठी जागा मागितली; मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. जेएनपीएच्या कचरा प्रकल्पात येथील कचरा समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कचरा वर्गीकरण करून आणण्यास सांगितले आहे. ग्रामपंचायतीकडे जास्त माणसे नसल्याने ते काम होत नाही. लवकरच याच्यातून तोडगा काढला जाईल.
- विनोद मिंडे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, उरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.