बदलापुरातील अनेक प्रभाग संपर्क क्षेत्राच्या बाहेर
बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : दुर्गम आणि डोंगराळ भागांतही आम्ही नेटवर्क पुरवण्यासाठी अग्रेसर आहोत, अशा जाहिराती करणाऱ्या अनेक मोबाईल कंपन्या बदलापुरात मात्र अपयशी ठरल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणे अनेकदा आऊट ऑफ नेटवर्क असतात तर बदलापूर शहरातील दोन्ही पोलिस स्थानकात कोणत्याच कंपनीच्या सिम कार्डला नेटवर्क नसते. त्यामुळे अनेकदा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नेटवर्क पुरवण्यासाठी कंपन्यांसह सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्रासलेले नागरिक करीत आहेत.
विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या बदलापूर शहरात अनेक मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळतच नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बदलापूर शहरातील प्राईम लोकेशन समजल्या जाणाऱ्या कात्रप परिसरातदेखील मोठमोठ्या मोबाईल कंपनीच्या सिम कार्डला नेटवर्क नाही. बदलापूर पश्चिमेला बेलवली, मांजर्ली, वालिवली, सोनिवली, बदलापूर गाव, बदलापूर गावातील पोलिस स्थानक तर पूर्वेला कात्रप, खरवई, आपटेवाडी, कीर्ती पोलिस एरिया, बदलापूर पूर्व पोलिस स्थानक, मानकिवली, ज्युवेली, पनवेल रिंग रोड या परिसरात नेटवर्कची मोठी समस्या आहे. त्यात जर या भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर मग मोबाईललाही नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा रिचार्ज दर करूनही आम्हाला टूजीचे नेटवर्कदेखील मिळत नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बदलापूर गाव येथील पश्चिमेकडील पोलिस ठाणे आणि बदलापूर पूर्वेकडील पोलिस ठाण्यातसुद्धा अनेक कंपन्यांच्या सिमला नेटवर्क नाही. त्यामुळे या ठिकाणी तक्रार घेऊन जाणारा किंवा अन्य कामांसाठी जाणारी व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाते. त्यामुळे निदान अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयात तरी मोबाईल यंत्रणा कार्यान्वित राहिल्या पाहिजेत, अशी मागणी येथील पोलिस आणि सामान्य नागरिक करीत आहेत.
टॉवरसाठी अल्प प्रतिसाद
बदलापुरात वाढणारी इमारतींची गर्दी आणि त्या तुलनेत मोबाईल टॉवरची संख्या कमी, यामुळे नेटवर्क नसल्याची तक्रार रोज येत असल्याचे एका खासगी मोबाईल सिम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी बदलापूर शहरात अनेक सोसायटी आणि आस्थापना यांना आपल्या जागेत मोबाईल टॉवर बसवण्याच्या वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात; मात्र टॉवरमधील रेडिएशनची भीती असल्याचे कारण देत बदलापुरात सोसायटीधारक किंवा आस्थापना हे टॉवर लावण्यास परवानगी देत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.