आलोंडे येथे आढळला अतिदुर्मिळ पोवळा साप
सर्पमित्राकडून जीवदान; महाराष्ट्रासहित भारतभर वास्तव्य
विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील आलोंडे (गुणगुणपाडा) येथे दुर्मिळ अशा विषारी पोवळा सापाचे दर्शन झाले आहे. त्याला सर्पमित्राकडून जंगलामध्ये सोडून देण्यात आले आहे.
सर्पमित्र पप्पू दिघे यांना आलोंडे येथील मानवी वस्तीमध्ये हा दुर्मिळ असा साप आढळून आला. विशेष म्हणजे हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र जंगलामध्ये संशोधन करत असतात. या दुर्मिळ सापाविषयी माहिती देताना दिघे यांनी सांगितले की, हा साप आकाराने अगदी लहान असतो. त्याला इंग्रजी भाषेमध्ये स्लेंडर कोरल स्नेक असेही म्हणतात. पोवळा हा वाळा सापासारखा पण त्यापेक्षा काहीसा मोठा व रंगसंगतीत आकर्षक असा असतो. याची नावे प्रत्येक राज्यात वेगवेगळी असली तरी महाराष्ट्रात याला पोवळा या नावाने ओळखले जाते. या सापाचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, चावलेल्या भागात वेदना होणे, अशी लक्षणे दिसतात. शिवाय २० ते ३० मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. हा साप लहान आकाराचा असल्यामुळे तो इतर वन्य प्राणी, पक्षी यांच्या भक्ष्यस्थानी पडतो. मुख्यतः दगडांच्या फटी, माती, वाळलेल्या पालापाचोळ्यात या सापाचे वास्तव्य असते. हा निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा निदर्शनास येत नाही. महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतभर आढळत असला तरी अत्यंत असा हा दुर्मिळ साप आहे. वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत शेड्यूल दोनमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे.
..........................
अवघा दीड सेंटीमीटर आकार
या सापाची लांबी जास्तीत जास्त ३० ते ४० सेमी व घेरी एक ते दीड सेंटीमीटर असते. याच्या शरीराचा रंग तपकिरी, मातकट व तांबूस करडा असतो. डोके व मान काळे तसेच शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असतात. पोटाचा रंग तांबूस असतो. लांबट सडपातळ असतो. त्याला डिवचले किंवा पकडण्याचा प्रयत्न केला तर शेपटी वर करून खवल्यांचा रंग लाल करतो. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आदी राज्यात पोवळा सापडल्याच्या नोंदी आहेत. या सापाची मादी वाळलेल्या पालापाचोळा किंवा दगडांच्या सपाटीत दोन ते सात अंडी घालते. जर हा साप घाबरला, तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका, असा इशारा देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.