पनवेल, ता. २६ (बातमीदार) : सिडकोकडून पनवेल महापालिकेची आता ‘कचरा कोंडी’ करण्यात येऊ लागले आहे. तळोजा येथील डम्पिंग ग्राउंडवर पालिकेचा कचरा घेण्यासाठी विलंब केला जात आहे. त्यामुळे तासनतास त्या ठिकाणी वाहने थांबून राहत आहेत. त्यामुळे घंटागाडी कामगारांना ताटकळत थांबावे लागत आहे. याविरोधात आझाद कामगार संघटनेने बुधवारी (ता. २५) आवाज उठवत २२ घंटागाड्या परत बोलावून या अडवणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर सिडको आणि महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर एक-दीड वर्षानंतर घनकचरा व्यवस्थापन सिडकोने महापालिकेकडे हस्तांतरित केले; मात्र कचरा टाकण्यासाठी कोणतीही नवीन जागा महामंडळाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे तळोजा येथील सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडवरच गेल्या काही वर्षांपासून कचरा टाकण्यात येत आहे. २००५ला निर्माण करण्यात आलेल्या या कचरा विल्हेवाट भूमीची क्षमता संपलेली आहे. या ठिकाणी कचऱ्यावर किती प्रक्रिया केली जाते, याकडे कोणाचेही लक्ष नाही. संबंधित एजन्सीकडून कचरा साठवून घेण्यापलीकडे फारसे वेगळे काही केले जात नाही, अशी तक्रार आहे. या ठिकाणी उलवे, करंजाडे, द्रोणागिरी या सिडको नोडमधील कचरासुद्धा टाकला जातो. त्या ठिकाणी सिडकोच्याही दररोज २० ते २५ गाड्या खाली केल्या जातात. त्याचबरोबर महापालिकेच्या ८० हून अधिक कचरावाहू गाड्या या डम्पिंग ग्राउंडवर येतात. याकरिता सिडकोला प्रक्रिया शुल्कसुद्धा भरले जाते; परंतु सिडको महामंडळाकडून आता पनवेल महापालिकेची कचरा कोंडी केली जाऊ लागली आहे.
-------------
वाहनचालक, कामगारांचे हाल
डम्पिंग ग्राऊंडवर वेगवेगळ्या पद्धतीने घंटागाड्या थांबवून धरल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहनचालक, घंटागाडी स्वच्छतादूतांना अडकून राहावे लागत आहे. स्वच्छतेसाठी कोणती व्यवस्था नसल्याने त्यांना जेवणही घेता येत नाही. त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ लागला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून बुधवारी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी महापालिकेचे लक्ष वेधले. घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त वैभव विधाते यांना पत्र देऊन घंटागाडी कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा आणि डम्पिंग ग्राउंडवर सिडकोकडून होणाऱ्या अडवणुकीबाबत त्वरित पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नावर पनवेल महापालिकेने वेळेत लक्ष घालावे आणि सिडकोशी समन्वय साधून तोडगा काढावा, अशी मागणी आझाद कामगार संघटनेच्या वतीने महादेव वाघमारे यांनी केली.
------------
घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम
चाळ येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरावाहू गाड्या लवकर खाली होत नसल्याने साहजिकच आवश्यक तितका कचरा विल्हेवाटीसाठी जात नाही. कित्येकदा एकाच ठिकाणी तो साठवून ठेवावा लागतो. त्याचबरोबर दैनंदिन संकलन करण्यातही अडचणी येत आहेत. सिडकोकडून होणाऱ्या अडवणुकीचा परिणाम पनवेल महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनावर होत आहे.
---------------
तळोजा क्षेपणभूमीवर कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना आतमध्ये उशिरा सोडले जाते. त्यामुळे वेळेत कचरा टाकला जात नाही. या कारणाने वाहनचालक, घंटागाडी कामगारांना अडकून राहावे लागते. त्यांना वेळेत जेवणसुद्धा करता येत नाही. सिडको आणि महापालिकेच्या समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवलेली आहे. याबाबत उपाययोजना न झाल्यास आझाद कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
- महादेव वाघमारे, अध्यक्ष, आझाद कामगार संघटना
---------------
मागील दोन-तीन दिवसांपासून कचरा क्षेपणभूमी व घंटागाडीसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोलून समस्या सोडवण्यात आली आहे. तसेच क्षेपणभूमीला जाणाऱ्या रस्त्याची डागडुजीही करण्यात आली आहे.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.