हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः राज्य शासनाच्या हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. घाटकोपरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वाक्षरी हिंदी भाषा सक्तीविरोधात, असा उपक्रम राबवण्यात आला. घाटकोपर पश्चिम पूर्व विभागातील सर्व शाळांच्या प्रवेशद्वारसमोर मनसे कार्यकर्त्यांनी ही स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेला पालकांसह विद्यार्थ्यांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. शालेय शिक्षणात तिसरी भाषा विद्यार्थांवर लादू नये, यासाठी मनसेसह विविध पक्षांनी, संघटनांनी, अभिनेत्यांनीदेखील आपला विरोध दर्शवला आहे. राज्य शासनाने प्रथम मराठी शाळा वाचवाव्यात. मनसे मराठी भाषेचा अवमान सहन करणार नाही, अशा इशारादेखील या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला. आनंद नगर प्रभाग १२६ मध्ये ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आल्याचे मनसेचे चेतन भाटकर, गणेश पवार यांनी सांगितले.
..................
संत कक्कया समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी होणार आंदोलन
धारावी (बातमीदार) : चामड्याशी संबंधित काम करणाऱ्या कक्कय्या समाजाची प्रगती व्हावी, यासाठी संत कक्कया समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सभागृहात दिलेल्या अश्वासनाची आठवण करून देण्यासाठी संत कक्कया समाजाचे एकदिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान येथे ७ जुलै रोजी करण्यात येणार आहे. संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे म्हणून वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबई मार्फत मागील वर्षी २८ जून रोजी धरणे आंदोलन आयोजित केले होते. त्या आंदोलनासाठी राज्यातील सर्व समाजबांधव, संस्था, महासंघ, संघटना असे सर्व घटक सहभागी झाले होते. त्या वेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संत कक्कया समाजालासुद्धा महामंडळ दिले जाईल, असे जाहीर केले होते, परंतु एक वर्ष उलटून गेले तरी त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सर्व सभासदांच्या मागणीचा विचार करता पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी, संत कक्कया समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ यांनी धरणे अंदोलन आयोजित केले आहे. आपल्या हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी संत कक्कया समाजातील सर्व बांधवांनी पुन्हा एकदा आझाद मैदान येथे धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबईकडून करण्यात आले आहे.
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.